संगणकीकृत ७/१२ साठी येणाऱ्या अडचणी दोन दिवसांत सोडवाव्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील खातेदारांना ऑनलाइन (Online) संगणकीकृत सातबारा मिळणे व ऑनलाइन फेरफार घेण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करुन दोन ते तीन दिवसांत नागरिकांना पूर्वीप्रमाणेच संगणकीकृत सातबारा व अन्य सेवा उपलब्ध होतील. धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी म्हटले आहे, नागरिकांना संगणकीकृत अधिकार अभिलेख उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यात ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन प्रा. लि. या शासनाने इनपॅनेल केलेल्या एजन्सीच्या जीसीसी क्लॉऊडसाठी महसूल यंत्रणेतील क्षेत्रीयस्तरावरील वापरकर्त्यांचे लॉग इन आयडी, पासवर्ड पुन:स्थापित करण्याची कार्यवाही जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्याकडून सुरू आहे. ही कार्यवाही सुरू असल्याने धुळे जिल्ह्यातील काही गावांमध्ये संगणकीकृत सातबारा खातेदारांना उपलब्ध होणे व ऑनलाइन फेरफार घेण्यासाठी अडचणी येत आहेत.

या तांत्रिक अडचणीचे निराकरण जमाबंदी आयुक्तांच्या हेल्प डेस्क लाइन मार्फत युध्दपातळीवर करण्यात येत असून येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करुन पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्वीप्रमाणेच संगणकीकृत सातबारा व अन्य सेवा उपलब्ध होतील. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.