क्रिकेट विश्वात ‘मॅच फिक्सिंग’ चा ‘भूकंप’ आणणार्‍या संजीव चावलाला इंग्लंडमधून भारतात आणलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २० वर्षांपूर्वी क्रिकेट जगताला हादरवून टाकणाऱ्या मॅच फिक्सिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी बुकी संजीव चावला यास ब्रिटनमधून आणण्यासाठी भारत यशस्वी झाले आहे. दिल्ली गुन्हे शाखेच्या एका पथकाने सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याला लंडनहून भारतात आणले. भारत आणि ब्रिटन यांच्यात सन १९९२ मध्ये प्रत्यर्पण करारा नंतर हाय – प्रोफाइल प्रकरणातील हा पहिला यशस्वी प्रत्यर्पण आहे. सन २००० च्या मॅच फिक्सिंग प्रकरणात तत्कालीन दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार हॅन्सी क्रोन्जेच्या सहभागामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांना आश्चर्यात टाकले होते.

या प्रकरणाचा तपास करणार्‍या संघाचे प्रमुख आणि दिल्ली पोलिसांचे माजी आयुक्त केके. पॉल यांच्या म्हणण्यानुसार, चावला सामना फिक्सिंग प्रकरणात हॅन्सी क्रोन्जे यांच्याशी सतत संपर्कात होता. हॅन्सी जरी आता या जगात नसेल, परंतु चावला याचे इतर लोकांशीही संपर्क आहेत. सन २००० मध्ये ही बाब उघडकीस आली तेव्हा संजीव चावला इंग्लंडमध्ये होता. तब्बल २० वर्षात चावलाला आणण्याच्या प्रयत्नांना यश आले. संजीव चावला १९९६ मध्ये यूकेला गेला होता. १ फेब्रुवारी २०१६ रोजी भारत सरकारने चावलाच्या प्रत्यर्पणासाठी विनंती केली.

संजीव चावला वर आरोपपत्र दाखल
दिल्ली पोलिसांनी सन २००० च्या मॅच फिक्सिंग प्रकरणात १३ वर्षानंतर संजीव चावला याच्याविरूद्ध जुलै २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले. यात फोन रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी चावला याने हॅन्सी क्रोन्जेला लाच दिल्याचा आरोप केला. चावला आणि हॅन्सी क्रोन्जे यांच्यातील संभाषण या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावलाची ओळख दक्षिण अफ्रिकेतील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने हॅन्सी क्रोन्जे याच्याशी करून दिली होती.

हॅन्सी क्रोन्जे याला धमकी द्यायचा चावला
३००० पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी असेही म्हटले होते की सन २००० मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या मालिकेदरम्यान संजीव चावला हा हॅन्सी क्रोन्जे यांच्याशी संपर्कात होता. हॅन्सी क्रोन्जे याला १५००० डॉलर लाच दिल्याचा आरोपही चावला याच्यावर आहे. आरोपपत्रामध्ये संलग्न केलेल्या निवेदनातून असेही समोर आले आहे की चावला दक्षिण आफ्रिकेच्या तत्कालीन कर्णधाराला धमकावत होता.

अशाप्रकारे हे प्रकरण उघडकीस आले
दिल्ली पोलिसांनी संजीव चावला आणि हॅन्सी क्रोन्जे यांच्यातील दूरध्वनीवरील संभाषण इंटरसेप्ट केले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. या संभाषणात दोघेही सामना फिक्स करण्यावर बोलत होते. तथापि, २००२ मध्ये हॅन्सीचा विमान अपघातात मृत्यू झाला, त्यानंतर त्याच्या विरोधातील तपास थांबविण्यात आला. चावलाला फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कोर्टाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. जर तो दोषी आढळला तर त्याला सात वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. असे झाल्यास, तो या प्रकरणातील असा पहिला आरोपी असेल ज्याला शिक्षा सुनावली जाईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चावलाला शहर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर तिहार तुरुंगात पाठविण्यात येईल.

कोण आहे संजीव चावला
संजीव चावला हा दिल्लीतील एक व्यापारी आहेत. चावला १९९६ मध्ये चावला बिजनेस व्हिसावर ब्रिटनला गेला होता, परंतु नियमितपणे त्याचे भारतात ये – जा चालू होते. संघटित गुन्हेगारी प्रकरणात त्याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी संजीव चावला यांचे फोन टॅप करण्यास सुरवात केली. या फोन टॅपिंग दरम्यान, सन २००० मध्ये त्याचा आणि हॅन्सी क्रोन्जे यांचे मॅच फिक्सिंगसंदर्भातील संभाषण उघडकीस आले. सन २००० मध्ये चावला यांचा भारतीय पासपोर्ट अवैध घोषित करण्यात आला होता. २००५ मध्ये त्याला यूकेचा पासपोर्ट मिळाला. चावलाचे वय आता ५० वर्ष इतके आहे.