राज्यपालांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन, भगतसिंग कोश्यारी यांचे पुण्यात आगमन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   स्वातंत्र्यदिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी पुण्यातील विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे मुख्य सरकारी ध्वजवंदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याच्या हस्ते होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आज (बुधवार) पुण्यातील राजभवन येथे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के वेकटेशम्, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग, तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमालाही लॉकडाऊन नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था वा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी माणसांमध्ये ध्वाजारोहणाचा कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यंदा भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम साजरा करण्यावर यंदा मर्यादा घालण्यात आल्या आहेत. वस्तुस्थिती व सावधगिरीचा उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढले असून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वाजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर राज्यपाल यांच्या हस्ते पुण्यात ध्वाजारोहण होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागीय क्षेत्रात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वाजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यभरात एकाचवेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.