निकालाआधीच झळकू लागले विजयाचे ‘फ्लॅक्स’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नव्या पिढीला कोणत्याही बाबतीत धीर धरण्याची सवयच नाही असे बोलले जाते. त्याचे प्रत्यंत्तर सध्या राजकारणातही येऊ लागले आहे. शहरातील अनेक ठिकाणी भाजपाच्या वेगवेगळ्या उमेदवारांचे अभिनंदन करणारे फ्लॅक्स शहरात ठिकठिकाणी अगोदरच लागायला सुरुवात झाली आहे.

सोमवारी मतदान झाल्यानंतर अनेकांनी आपल्या विजयाचा दावा केला. तर काही जणांच्या समर्थकांनी विजयाचा दावा करीत फटाके फोडले होते. आज गुरुवारी मतमोजणी होणार आहे. निकाल काय लागणार हे बहुतांश ठिकाणी अगोदरच निश्चित असतो. तरीही मतमोजणी झाल्यानंतर निकाल स्पष्ट झाल्यावरच विजयी उमेदवारांचे अभिनंदन होत असते. पण आता ही पद्धतच बदलली आहे.

एका विधानसभा मतदारसंघातून एकच जण निवडून येतो. पण खडकवासला मतदारसंघ असा आहे की, त्यातील दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांच्या विजयाचा दावा करुन अभिनंदन करणारे फलक लावले आहेत.

खडकवासलामधून भाजपाचे भीमराव तापकीर हे विजयी झाल्याबद्दलचे अभिनंदन करणारे फ्लॅक्स लावले होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे फ्लॅक्स सर्वात अगोदर लागले गेले आहेत.

आता कसब्यातून विजयी झाल्याबद्दल अभिनंदन करणारे फ्लॅक्स शहराच्या मध्य भागात आज सकाळी लागलेले दिसून आले आहे. शहरातील बेलबाग चौक येथे महापौर आणि भाजपाच्या उमेदवार मुक्ता टिळक यांचे अभिनंद करणारे फ्लॅक्स लावण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com