FlashBack 2020 : सरत्या वर्षात देशात घडलेल्या 10 महत्त्वाच्या घटना !

1) नमस्ते ट्रम्प – 24 आणि 25 फेब्रुवारीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी दिल्ली आणि गुजरातला भेट दिली. अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी नमस्ते ट्रम्पचं आयोजन करण्यात आलं होतं.

2) टिकटॉकवर बंदी – 130 कोटी भारतीयांचा डेटा आण खासगीपणाचं संरक्षण व्हावं यासाठी केंद्र सरकारनं टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं चीनला कोट्यावधीचा फटका बसला आहे.

3) राम मंदिर भूमीपूजन – 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमीपूजन झालं. हे मंदिर 161 फूट उंच असेल. कोरोनाचं संकटामुळं या सोहळ्याला कमी लोकांची उपस्थिती होती. तशी व्यवस्था करण्यात आली होती.

4) बाबरी मशीद खटला – बाबरी मशीद उध्वस्त करण्याच्या कटात सहभागी झाल्याचा वहिम असलेल्या 32 जणांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) च्या विशेष न्यायालयानं 30 सप्टेंबर रोजी निर्दोष मुक्तता केली. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींचा समावेश आहे.

5) उद्योगांसाठी 20 लाखांचं पॅकेज – लॉकडाऊनमुळं देशातील उद्योगांचं मोठं नुकसान झालं. या स्थितीत दिलासा मिळावा, या उद्देशानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 20 लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. जीडीपीच्या सुमारे 10 टक्के असं हे पॅकेज असेल.

6) कर्जे झाली स्वस्त – जानेवारी महिन्यापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2 वेळेला रेपो रेटमध्ये कपात (1.15 टक्के) केल्यानं बँकांच्या कर्जावरील व्याजदरात कपात झाली आहे. परिणामी कर्जे स्वस्त झाली आहे.

7) हाथरस घटना – उत्तर प्रदेशातील हाथरस इथं एका दलित तरुणीवर बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला. या घटनेनं देशभरात संतापाची लाट उसळली होती. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं होतं.

8) शेतकरी आंदोलन – केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलं असून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या मांडला आहे. कृषी कायदे रद्द करण्याची आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

9) आपनं दिल्ली, भाजप-जेडीयुनं बिहार राखलं – कोरोनानं भारतात चंचूप्रवेश केला असताना फेब्रुवारीत दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली. त्यात आम आदमी पक्षानं 70 पैकी 62 जागा जिंकत सत्ता कायम राखली. तर कोरोना काळात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयुनं बाजी मारली.

10) बॉलिवूडवर चौकशीची नशा – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनची जोरदार चर्चा झाली. रिया चक्रवर्तीसह दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह अशा काही अभिनेत्रींची एनसीबीनं चौकशी केली. परंतु त्यातून फारसं काही हाती लागताना दिसलं नाही.