Flashback 2020 : 2020 मध्ये क्रीडा विश्वातील ‘या’ दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप !
पोलिसनामा ऑनलाइन – 2020 या वर्षात अनेक दिग्गजांनी आपल्या चाहत्यांचा आणि जगाचा निरोप घेतला आहे. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांनी एक्झिट घेतली ज्यामुळं अनेकांच्या मनाला चटका लागला.
1) कोब ब्रायंट (1978-2020) – नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) ची जादू भारतातही पसरताना दिसत आहे. मायकेल जॉर्डन , मॅजिक जॉन्सन, लॅरी बर्ड आदींनी 1990 चं दशक गाजवलं. यापैकी एक दिग्गज म्हणजे कोब ब्रायंट . 1996 ते 2016 अशी जवळपास 20 वर्षे ब्रायंटनं NBA कोर्ट गाजवलं. 26 जानेवारीला हेलिकॉप्टर अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यासह त्याच्या 13 वर्षीय मुलगी गिएना हिचाही या अपघातात मृत्यू झाला.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
2) बलबीर सिंग सीनियर (1923-2020) – भारताचे दिग्गज हॉकीपटू बलबीर सिंग दोसांझ यांनी याचवर्षी जगाचा निरोप घेतला. 1948 लंडन, 1952 हेल्सींकी आणि 1956 मेलबर्न अशा तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि तीनही वेळी सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण 22 गोल्स केले होते. 1952 च्या सुवर्णपदाकाच्या सामन्यात नेदरलँडविरूद्धच्या 6-1 अशा विजयात बलबीर सिंग यांनी 5 गोल्स केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक 5 वैयक्तिक गोलचा विक्रम हा त्यांच्याच नावावर आहे. 1957 मध्ये पद्म श्री पुरस्कार जिंकणारे ते पहिले खेळाडू ठरले. 25 मे 2020 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
3) राजिंदर गोएल (1942-2020) – भारताचे महान फिरकीपटू राजिंदर गोएल यांचं या वर्षी निधन झालं. रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 637 विकेट्सचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे. 77 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
4) चेतन चौहान (1947-2020) – चेतन चौहान यांचं वयाच्या 73 व्या वर्षी कोरोनामुळं निधन झालं. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57 च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्षे DDVA चे उपाध्यक्षपदही सांभाळलं त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. कसोटी व्यतिरीक्त त्यांनी 7 वनडे सामन्यात 153 धावाही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. 1981 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
5) डिन जोन्स (1961-2020) – ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज डिन जोन्स यांचं मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये 6068 धावा केल्या, तर 52 कसोटीत 11 शतकांसह 3631 धावा केल्या आहेत. ते 59 वर्षांचे होते.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
6) चुनी गोस्वामी (1938-2020) – भारताचे दिग्गज फुटबॉलपटू चुनी गोस्वामी यांनी 1960 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलं. 30 सामन्यात त्यांनी 9 गोल केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. 1960 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं त्यांनी नेतृत्व सांभाळलं होतं आणि 1964 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संघानं आशिया कप स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं. 30 एप्रिलला वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
7) दिएगो मॅराडोना (1960-2020) – अर्जेंटीनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 1986 साली आपल्या बहारदार खेळानं अर्जेंटीना विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅराडोना यांचं नाव फुटबॉल विश्वात प्रसिद्ध झालं. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यानं काही दिवसांपूर्वीच मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅराडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही झाली. यातून सावरल्यानंतर मॅराडोना यांना 11 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरी हलवण्यात आलं होतं. राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
— TimePass (@TimePassTalks) December 24, 2020
मॅराडोना यांनी 1986 चा फिफा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांची कारकीर्द जेवढी शानदार होती तितकीच वादग्रस्त देखील ठरली होती. मॅराडोना यांनी बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बार्सिलोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. इग्लंडविरुद्ध1986 साली झालेल्या स्पर्धेतील गोल फुटबॉल विश्व कधीही विसरणार नाही. याच गोलला हँड ऑफ गॉड असंही संबोधलं जातं. अनेक वर्षांनंतर त्यांनी हेतुपुरस्सरपणे चेंडूला हात लावल्याची कबुली देखील दिली होती. त्यांनी त्याच सामन्यात 4 मिनिटांनंतर सुरेख असा गोल केला होता. फिफानं या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल म्हणून संबोधलं होतं.