Flashback 2020 : देशातील 2020 या वर्षातले Top-10 श्रीमंत व्यक्ती, नंबर 1 वर मुकेश अंबानी, जाणून घ्या इतरांची नावे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

१) मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सलग ९ वेळा त्यांनी भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान कायम राखलं आहे. यावेळी त्यांच्या श्रीमंतीत तब्बल ७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ६,५८,४०० कोटी इतकी आहे. लॉकडाऊन असतानाही मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तासाला ९० कोटींची वाढ होत होती.

२) हिंदुजा ब्रदर्स
एकूण १,४३,७०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह हिंदुजा ब्रदर्स दुसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, २०२० या वर्षात त्यांच्या संपत्तीत २३ टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आले आहेत. इंडसइंड बँक, गल्फ ऑइल आणि जीओसीएलच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांच्या संपत्तीत घट झाल्याचं दिसून येतं.

३) शीव नाडर
एचसीएल टेक्नॉलॉजिसचे संस्थापक शीव नाडर यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असून भारतीय श्रीमंतांच्या यादीत त्यांनी दोन स्थानांची मजल मारली आहे. जुलैमध्ये नाडर यांच्या एकूण संपत्तीची नोंद १ लाख ४१ हजार ७०० कोटी रुपये इतकी करण्यात आली. शिव नाडर हे एचसीएल कंपनीच्या चेअरमन पदावरुन पायऊतार झाले असून त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्रा आता उद्योग सांभाळत आहेत.

४) गौतम अदानी
अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी तब्बल ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर आहेत.

५) अझीम प्रेमजी
विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांच्या क्रमवारीत दोन स्थानांची घट झाली असून ते भारतीय श्रीमंतांच्या यादीत आता पाचव्या स्थानावर आहेत. अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती १ लाख १४ हजार ४९९ कोटी इतकी आहे.

६) सायरस पुनावला
सीरम इस्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावला यांच्या संपत्तीत यंदा ६ टक्क्यांची वाढ झाली असून ते आता सहाव्या स्थानी पोहोचले आहेत. पुनावाला यांच्या सीरम इंस्टिट्यूटमध्येत कोरोनावरील लस तयार केली जात आहे.

७) राधाकिशन दमानी
एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी पहिल्यांदाच भारतीय श्रीमंतांच्या टॉप-१० यादीत प्रवेश केला आहे. दमानी यांच्या एकूण संपत्तीची ८७ हजार २०० कोटी इतकी करण्यात आली आहे.

८) उदय कोटक
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी भारतीय श्रीमंतांच्या यादीत ८ वे स्थान पटाकवले आहे. कोटक यांची एकूण संपत्ती ८७ हजार कोटी इतकी आहे.

९) दिलीप शांघवी
सन फार्माचे संस्थापक दिलीप शांघवी यांच्या कंपनीच्या संपत्तीत यंदा २२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. तर शांघवी यांची संपत्ती १८ टक्क्यांनी वाढून ८४ हजार कोटींवर पोहोचली आहे.

१०) पालनजी ब्रदर्स, सायरस आणि शापूर पालनजी
पालनजी ब्रदर्स, सायरस आणि शापूर पालनजी यांना भारतीय श्रीमंत व्यक्तींच्या यादीत संयुक्तपणे १० वे स्थान मिळाले आहे. दोघांच्या संपत्तीची ७६ हजार कोटी इतकी नोंद झाली आहे.