जगातील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलिफानंतर दुबईत बनतेय आणखी एक आश्चर्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबई आपल्या बहुमजली इमारती, सुंदर आणि अत्याधुनिक मानवनिर्मित बेट आणि जगातील सर्वांत उंच इमारत खलिफासाठी प्रसिद्ध आहे. पण आता येथे तरंगणारे हॉटेलसुद्धा बनवले जात आहे. यास समुद्राच्या जोरदार लाटासुद्धा हलवू शकणार नाहीत. या हॉटेलची खासियत जाणून घेऊयात…

हे हॉटेल बनवण्यास सुमारे 1212 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हॉटेलचे नाव फ्लोटिंग सी पॅलेस अँड रिसाॅर्ट असेल. मुख्य हॉटेलच्या तरंगणार्‍या इमारतीला सहा तरंगणारे ग्लास बोट विलासुद्धा जोडलेले असतील. येथे जाण्यासाठी तरंगणारा पूल असेल. तसेच तुम्ही थेट स्पीड बोटीनेसुद्धा आपल्या विलामध्ये जाऊ शकता.

समुद्राच्या जोरदार लाटासुद्धा यास हलवू शकणार नाहीत, कारण यामध्ये शॅफ्ट मोटर्स लावलेल्या आहेत, ज्या लाटांची उंची आणि वेगाला सहन करू शकतील. हॉटेल दुबईच्या मरीना किनार्‍याजवळ उभारण्यात येत आहे. हॉटेलचा नेपच्यून नावाचा एक ग्लास विला पूर्ण तयार झाला आहे.

हे हॉटेल बनवणारी कंपनी बारावी ग्रुपचे सीईओ मोहम्मद अल बारावी यांनी गल्फ न्यूजला सांगितले की, हॉटेलचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात उर्वरित कामसुद्धा पूर्ण होईल. नेपच्यून ग्लास बोट विला यूएईचे भारतीय बिझनेसमॅन बलविंदर साहनी यांनी खरेदी केले आहे.

नेपच्यून ग्लास बोट विलामध्ये दोन फ्लोअर आहेत. बाहेरच्या बाजूला एक स्वीमिंग पूल आहे. प्रत्येक फ्लोअर 300 स्क्वेअर मीटरचा आहे. पहिल्या फ्लोअरवर चार बेडरूम आहेत. प्रत्येक ग्लास बोट विला इकोफ्रेंडली बनवण्यात आला आहे. याच्या आत ऑटोमॅटिक एअर फिल्ट्रेशन सिस्टिम लावलेली आहे, जी समुद्राची हवा स्वच्छ करून घरात पाठवेल. सौरऊर्जेतून वीज मिळेल आणि कचरा रिसायकलिंग सिस्टिमसुद्धा लावलेली आहे.