‘वीर’च्या १ लाख पाण्याच्या विसर्गाने नीरा काठच्या गावात शिरले पाणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वीर धरणातून नीरा नदीत सोमवारी (दि.५) सकाळी नऊ वाजता १ लाख २ हजार ८०५ क्युसेक्स पाणी सोडल्याने नीरा नदीने धोक्याची पातळी ओलांडून रूद्रावतार धारण केले होते. त्यामुळे नीरा परिसरातील पाडेगाव येथील पाणीपुरवठा विहीरीला पाणी लागले होते तर सरहद्देचा ओढयाच्या पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.  नीरा परिसरातील नीरा नदी काठच्या रहिवाशांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरण शंभर टक्के होऊन त्यातून वीर धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने पर्यायाने वीर धरणातून नीरा नदीत  सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करून सोमवारी (दि.५) सकाळी साडे सहा वाजता ९४ हजार २५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. तर सकाळी नऊ वाजता तो १लाख २ हजार ८०५ क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर सकाळी आकरा नंतर त्यामध्ये कमी करून ९९ हजार ४७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग संध्याकाळ पर्यंत सुरू होता. त्यामुळे नीरा नदीची पुरस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्याची चर्चा पुराचे पाणी पाहवयास आलेल्या नागरिकांमध्ये होती. त्यामुळे नीरा नदीला पाणी वाढल्याने नीरा व परिसरातील नदीकाठचे नागरिक भीती व्यक्त करीत होते.

नीरा नदीला आलेल्या भयानक

पुरामुळे नीरा नदी काठी असलेल्या नीरा गावच्या हद्दीतील मारूतीचे मंदिर, महादेवाच्या मंदिराला पाणी लागले होते तर स्मशानभूमी अर्ध्यापेक्षा जास्त पाण्याखाली गेली होती. पाडेगांव (ता.खंडाळा) हद्दीतील नीरा नदी काठावरील दत्त मंदिर पुर्ण पाण्याखाली गेले होते. पाडेगांवच्या पाणीपुरवठा विहीरीला पाणी लागले होते. तसेच पिंपरेखुर्द येथील नारळीच्या मळ्यात व निंबुत येथील आनंदनगर, लक्ष्मीनगर येथील सात -आठ घरांमध्ये पाणी शिरले होते.

नीरा येथील नदी काठावर असलेल्या डोंबारी समाजातील २२ कुटुंबातील १८३ लोकांपैकी प्राथमिक शाळेत ९९ लोकांना, वार्ड नं. १ मधील अंगणवाडीत २६ लोकांना तर वाँटर सप्लायमधील खोल्यांत ५८ लोकांना स्थलांतर करण्यात आले असून त्यांना ग्रामस्थांनी अन्नधान्य देऊन मदत केली.

पुरंदरचे प्रांताधिकारी, तहसीलदारांनी केली पुरस्थितीची पाहणी

नीरा नदीला आलेल्या महापुरामुळे नीरा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याच्या पार्श्वभूमीवर  नीरा (ता.पुरंदर) येथील पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी पुरस्थितीची व स्थलांतरित लोकांची पाहणी केली.

नीरा, लोणंद पोलिसांचा चोख बंदोबस्त

नीरा नदीच्या आलेल्या पुरामुळे बघ्यांची तोबा गर्दी झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जेजुरीचे स.पो.नि. अंकुश माने, सहा. फौजदार बाळासाहेब बनकर, पो.काँ. विनोद हाके यांनी नीरा बाजूस व लोणंदचे स.पो.नि. संतोष चौधरी, सहा.फौजदार बी.व्ही. वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आरोग्यविषयक वृत्त