पुणे : खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेस पाणी सोडणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासला, पानशेत धरण १०० टक्के भरल्याने पानशेतमधून मोठ्या प्रमाणावर नदीत विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून शनिवारी सकाळी ११ वाजता २७ हजार ३०३ क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण होणार असून नदीलगतच्या अनेक भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

सध्या खडकवासला धरणातून २० हजार क्युसेस पाणी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे आताच नदीपात्र ओसंडून वाहत आहे. शुक्रवारी रात्रभर जोरदार पाऊस पडला असून पानशेत व खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. पानशेत धरणातून नदीत ९ हजार ८९२ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. वरसगाव धरणही ९० टक्के भरले आहे. पानशेत धरण क्षेत्रात १२२ मिमी, वरसगाव धरण परिसरात ११६ मिमी, टेमघर येथे १७८ मिमी खडकवासला धरण परिसरात ३० मिमी पाऊस झाला आहे.

खडकवासला धरणातून २७ हजार क्युसेस पाणी सोडल्यानंतर पुणे शहरातील खिलारे वाडी, पुलाची वाडी, तसेच शिवाजीनगर कोर्टाच्या मागील बाजूच्या झोपडपट्टीत पाणी शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने सावधानतेचा इशारा दिला असून या भागातील नागरिकांना हलविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत.

मुळशी धरण ९६ टक्के भरले असून सध्या धरणातून १५ हजार ५३६ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा नदीला पूर आला आहे. पवना धरण ९७ टकके भरले असून तेथून लवकर पाणी सोडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुळशी धरणातून सोडलेले पाणी, त्यानंतरच्या परिसरात पडलेला पाऊस यामुळे मुळा नदीला पूर आला आहे तर खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे मुठा नदीला पूर आला आहे. या दोन्ही नद्यांच्या संगमावर मोठ्या प्रमाणावर फुगवठा तयार झाला आहे. त्यामुळे पाटील इस्टेट परिसरात पाणी शिरण्याची शक्यता आहे.

सध्या बंडगार्डन येथून नदीत १ लाख १८ हजार क्युसेस पाणी वाहत आहे. त्यात दुपारनंतर वाढ होण्याची शक्यता आहे. दौंड येथील बंधाऱ्यावरुन १ लाख ५८ हजार क्युसेस पाणी उजनी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. वीर व अन्य धरणातून पाणी सोडण्यात आल्याने निरा नरसिंगपूर येथील संगमावरुन ३ लाख १९ हजार क्युसेस भीमा नदीत वाहत आहे. पंढरपूर येथे सध्या ३ लाख ३४ हजार क्युसेस पाणी वाहत असून पाण्यात आणखी वाढ झाल्यास पंढरपुरात पूर येण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like