नागपूरकरांनी तुकाराम मुंढेंना दिला अनोखा निरोप, गाडीवर केली पुष्पवृष्टी अन् समर्थनार्थ घोषणाबाजी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना नागपूरकरांनी आगळावेगळा निरोप दिला. नागपुरातील शासकीय निवासस्थानातून मुंबईकडे रवाना होत असताना नागरिकांनी मुंढे यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी केली आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. तर काही तरुण मुंढे यांनी नागपूर सोडू नये म्हणून त्यांच्या गाडीसमोर आडवेही झाले होते. तर अनेक जण त्यांच्या गाडीमागेही धावत होते. नागपूरकरांचा हात जोडून नमस्कार करत तुकाराम मुंढे यांनी त्यांचा निरोप घेतला.

नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते. त्याकरिता त्यांना निरोप देण्यासाठी गुरुवारपासूनच त्यांच्या घरी रांघ लागली होती. कुणी पुष्पगुच्छ आणत होते तर कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते. कुणी त्यांना राखी बांधत होते तर कोणी भेटवस्तू आणत होते. जो तो आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करत होता. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून मुंढे यांच्या निवासस्थानासमोर गर्दी जमू लागली होती.

बघता बघता गर्दी वाढू लागली. तुकाराम मुंढे परत या अशा घोषणा हेवेत निनादू लागल्या. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी हजर झाले होते. पोलीस बंदोबस्त देखील तगडा होता. शेवटी साडेदहाच्या सुमारास तुकाराम मुंढे बाहेर आले. त्यांनी उपस्थित नागरिकांना अभिवादन केले व ते गाडीत बसले. त्यांच्या गाडीवर फुलांचा, घोषणांचा, गुलालाचा वर्षाव करण्यात आला. मी तुकाराम मुंढे, आय सपोर्ट तुकाराम मुंढे, माय रियल हिरो तुकाराम मुंढे अशा आशयाचे अनेक फलक त्या ठिकाणी झळकत होते. तर काही तरुण ‘आगे आगे मुंढे पीछे पड गये गुंडे’ अशा घोषणा देत होते.

सुमारे दीड तास मुंढे यांच्या घरासमोर समर्थकांची गर्दी होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचाही लोकांना विसर पडला होता. मुंढे यांच्या घरासमोरचा रस्ता महत्त्वाचा असल्याने त्यावरची वाहतूक सांभाळताना आणि लोकांनी रस्त्यावरुन बाजूला करताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. अनेक तरुणांसोबत आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचे वाद झाले. काही वेळा पोलिसांनी लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक तेथून हटायला तयार नव्हते. काहींनी मुंढे यांच्यासोबत दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी पाहून मुंढे तिथे थांबले नाहीत. ते फक्त लोकांना अभिवादन करत होते. उपस्थित पोलिसांनी त्यांना अभिवादन केले. त्यांचा स्वीकार त्यांनी केला आणि ते विमानतळाकडे रवाना झाले.