फुले महागली : झेंडू १६०, अस्टर ४००, मोगरा ८०० ते १ हजार रुपये प्रति किलो 

मुंबई | पोलीसनामा ऑनलाइन 

यंदा गणेशोत्सवात फुलांची दरवाढ अधिकच जाणवत आहे. इंधन दरवाढीच्या कारणामुळे भाज्यांसोबतच फुलांचेही भाव गगनाला भिडले आहेत. अस्टर, मोगरा, जास्वंद ते अगदी केळीच्या पानांनीही दराची नवी झेप घेतली आहे. हरतालिका पूजन, गणेश चतुर्थी या पार्श्वभूमीवर मार्केट फुलांनी बहरले आहेत.

पुण्यासह राज्यभरात विघ्नहर्त्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन

झेंडूची किंमत बुधवारी १२० ते १६० रुपये किलो होती मात्र ही किंमत प्रत्यक्ष गणेश चतुर्थी आणि गौरी आगमनाच्या वेळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अस्टरची किंमत ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. गुलाबाच्या पाकळ्या, मिश्र फुलांचा गेल्या आठवड्यांपर्यंत दहा रुपयांना मिळणारा वाटा २५ रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यात पाच ते सात रुपयाला उपलब्ध असणारे गुलाबाचे फूलही २० रुपयांपार गेले आहे. गुलाबी, पिवळ्या, लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाच्या गुलाबासाठी अगदी ४० रुपये किंमतही सांगितली जात आहे. या रंगाची फुले कमी असल्याने त्याच्या किंमती अधिक असल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B07GTZBH4G,B07GZY794B,B07GZY3PWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14731273-b712-11e8-b3bb-47c0cbb2726b’]
पांढऱ्या फुलांच्या किमती ऐकून यंदा गणेशभक्तांना धडकीच भरली आहे. मोगऱ्याची किंमत ८०० ते १ हजार रुपये प्रति किलो सांगितली जात आहे. ऑर्किडचे एक फूल ५० रुपये, तर जरबेरा २० ते २५ रुपयांना उपलब्ध आहे. स्थानिक मार्केट आणि दादरचा फुलबाजार यांच्या किमतीमध्येही फारशी तफावत नाही. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी बुधवारी दादरच्या फुलबाजारात मोठी गर्दी होती. या वाढलेल्या दरांनी गणेशभक्त हबकून गेले असले तरी गणेशोत्सव उत्साहातच व्हायला हवा यामुळे फुलांची खरेदीही होत होती.
केवड्याचे पान, मोगऱ्याऐवजी तगर, झेंडू, जास्वंद यांची खरेदी ग्राहकांनी केली. गौरी आगमनाच्या दिवशी या किंमती आणखी थोड्या वर चढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे माळा, गजऱ्यांसाठी अनेकांनी बुधवारीच फुलांची अतिरिक्त खरेदीही केली. ही फुले फ्रीजमध्ये तीन-चार दिवस टिकत असल्याने भाज्यांच्या साठ्यासोबत फुलांचाही साठा करण्यालाही अनेकांनी प्राधान्य दिले.

पंकज उधास यांचे ‘गणेश भक्तीगीत‘ प्रकाशित

गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी फुलांच्या चढलेल्या किंमतीसोबतच सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या खऱ्या फुलांच्या कमानीचे दरही प्रचंड महाग होते. महिन्याभरापूर्वी आगाऊ नोंदणी करून १ हजार ८०० ते २ हजार रुपयांना उपलब्ध असलेली कमान बुधवारी २५०० पासून पुढे विक्रीसाठी उपलब्ध होती. या कमानींची किंमत ५ हजार रुपयेही सांगितली जात होती. मात्र इतर पर्याय नसल्याने गणेशभक्तांनी ही किंमतही मोजली.