कौतुकास्पद ! नागपूरची अंतरा मेहता महाराष्ट्राची पहिली महिला ‘फायटर’ पायलट !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – महाराष्ट्राला पहिली महिला लढाऊ वैमानिक अखेर मिळाली आहे. अंतरा मेहता असे त्यांचे नाव आहे. नागपूरच्या अंतरा मेहता यांची भारतीय हवाई दलात ’फायटर पायलट अर्थात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झाली आहे. या पदावर निवड झालेल्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. शिवाय ’फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून निवड झालेल्या या वर्षीच्या तुकडीतील त्या देशातील एकमेव महिला अधिकारी आहेत.

अंतरा मेहता यांचे प्राथमिक शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स स्कूलमध्ये झाले असून अभियांत्रिकीचं शिक्षण रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी एसएसबीची तयारी केली. मग त्यांनी हैदराबाद येथील डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. ’पिलेटस पीसी-7’, दुसर्‍या टप्प्यात त्यांनी ’किरण एमके-1’ हे लढाऊ विमान उडवले.

मागील आठवड्यात शनिवारी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह 123 प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे ’हॉक्स’ या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील 10 महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहतांचा समावेश झाला आहे. नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.