‘उड्डाणपूल’ वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आ. शिरोळे यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहाणी

पुणे- येथील गणेश खिंड रस्ता – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इ-स्केअर हे उड्डाणपूल पाडण्याची कारवाई चालू असताना वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नियोजन आराखडा करण्यात येत आहे त्या दृष्टीने पूल आणि परिसराची पाहाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिकेचे, पोलीस खात्याचे आणि पीएमआरडीएचे अधिकारी यांच्यासमवेत केली.

या पाहाणी दौऱ्यात महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पीएमआरडीएचे कमिशनर विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ.राजेंद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त(वाहतूक) डॉ.संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुरेंद्र देशमुख, महानगर नियोजन प्रमुख विवेक खरवडकर, महापालिकेचे मुख्य अभियंता (वाहतूक) श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

या पाहाणीमध्ये औंध, बाणेर रोडवरील पाहाणीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला. आधी जेव्हा हे दोन्ही पूल बांधले गेले त्यावेळी वाहतूक नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आता हे पूल पुन्हा बांधले जात असताना वाहतूक नियोजन व्हावे जेणेकरुन वाहतुकीला अडथळा येणार नाही अशी मागणी शिरोळे यांनी केली.

पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बैठक घेतली त्यातही आमदार शिरोळे यांनी हीच भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेला सर्वांनी दुजोरा दिला. त्यादृष्टीने आता आराखडा करण्यात येत आहे. हा आराखडा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसमोरही मांडला जावा असे आमदार शिरोळे यांनी सुचविले आहे.