जनजागृतीच्या माध्यमातून वाहन अपघाताची संख्या कमी करण्यावर भर : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
शहराची वाढती लोकसंख्या पाहता वाहनांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या शहरात 53 लाख वाहनांची संख्या असून, दररोज 500 ते 600 वाहनांची नव्याने नोंदणी होतं आहे. वाहने वाढली मात्र रस्ते वाढले नाहीत. याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर होतं आहे. नियम न पाळल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, वर्षाकाठी 1500 लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन करुन वाहन अपघाताची संख्या कमी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मत शहराच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले. वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या वाहतूक पंधरवडा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

मागील पंधरा दिवसात 1 कोटी रुपयांचा दंड वाहतूक शाखेने जमा केला आहे. जर बारा महिन्यांचा विचार केला तर तो 24 कोटी रुपये होतो. त्यामुळे तुम्ही कशाला एवढा दंड भरता, त्यापेक्षा वाहतूकीचे नियम पाळा असे अावाहन देखील त्यांनी यावेळी पुणेकरांना केले.

प्रबोधनपर सीडीचे प्रकाशन
शहरात वाहतुकीचे नियमन करत असताना उन्हापासून बचाव व्हावा यासाठी प्रायोगित तत्वावर मान्यवरांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना जॅकेटचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी वाहतूकीच्या नियमाचे पालन करावे म्हणून प्रबोधनपर सीडी चे देखील प्रकाशन करण्यात आले. तसेच वाहतूक सप्ताहाध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार अमर साबळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पुणे महानगरपालिका आयुक्त साैरभ राव, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबसाहेब आजरी,सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र कदम, अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बसवराज तेली, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वाहतूक सप्ताह फक्त पंधरा दिवस न राहता तो वर्षातील 12 ही महिने राबविण्यात यावा असे मत खासदार अमर साबळे यांनी या निमित्ताने व्यक्त केले. ते म्हणाले कोणताही राजकीय पक्ष वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत बोलताना दिसत नाही. जोपर्यंत वाढती लोकसंख्या व वाहने याबाबत गांभिऱ्याने विचार करत नाहीत तोपर्यंत अपघाताचे प्रमाण कमी होत नाही. शहराच्या वाहतूक व्यवस्था बळकट होण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी खासदार निधीतून काही तरतूद करण्यास मी व खासदार शिरोळे सहकार्य करण्यास तयार आहोत असे ही खासदार साबळे म्हणाले. यावेळी खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. त्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले देशात लाखो लोक अपघातात मरण पावतात त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अपघाताची ठिकाणे शोधून त्यावर उपाय करण्यात येत आहेत. यासाठी स्वःतह नियम पाळ णे गरजेचे आहे. जोपर्यंत आपल्याला नियम पाळण्याची सवय लागत नाही तोपर्यंत बदल होणार नाही.

पुणे जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी म्हणाले अपघाताचा विषाणू हटविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. वाहतूक नियम पाळण्याची चळवळ व्हायला हवी त्याच वेळी खरा बदल आपल्याला दिसेल. या सप्ताहाच्या कालावधीत पुणे आरटीअोच्या वतीने एक लाख वाहतूक प्रबोधन करणाऱ्या स्टीकर्सचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक तास, प्रत्येक वेळ सडक सुरक्षा असावी, अपघात थांबवणे हे कोणा एकाचे काम नसून ती आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे मत महानगरपालिकेचे आयुक्त साैरभ राव यांनी व्यक्त केले. तसेच शहरात दिवसभर उन्हात उभे राहून वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे संरक्षण व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 500 जॅकेट उपलब्ध करुन दिले जातील. जोपर्यंत आपल्याला स्वयंशिस्त लागत नाही तोपर्यंत वाहतूक नियम पाळले जात नाहीत. खासगी वाहनांची वापर कमी करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सर्वांनी केला तर मोठ्याप्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी आपण कमी करु शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.