Pune News : ’10 वी चे वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास कर’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला विद्यार्थिनीला सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 26) पुण्यातील येरवडा कारागृहामधील ऐतिहासिक वास्तू या जेल पर्यटन म्हणून राज्य सरकारने घोषित केल्या आहेत. त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. या निमित्ताने पाहणी करण्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी पवार यांनी संवाद साधला. पवार यांनी एका विद्यार्थिनीला विचारले. तुझ नाव काय, कितवीला आहेस, त्यावर त्या विद्यार्थिनीने माझं नाव आयुषा शिर्के असून मी इयत्ता दहावीत शिकत आहे. दादा, ते ऐकताच म्हणाले, दहावीच वर्ष म्हटल्यावर महत्वाच वर्ष आहे. तू दररोज शाळेत जाते का? किती जण दररोज वर्गात असतात? सर्व सुरक्षितता आहे का, सर्व नियम पाळून वर्ग घेतले जातात ना हे सर्व प्रश्न तिला विचारल्यावर, त्या विद्यार्थिनीने हो दादा थोडे थोडे विद्यार्थी येत आहेत आणि सर्व नियम पाळूनच शिकवले जात असल्याचे तिने सांगतिले. त्यावर पवार यांनी तिला चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

येरवडा कारागृहात ज्या ठिकाणी स्वातंत्र्य पूर्व काळातील व्यक्तीना कारावास भोगावा लागला, अशा ऐतिहासिक वास्तूचे शालेय विद्यार्थी आणि सामाजिक संस्था करिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत उदघाटन झाले. मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या पार्श्वभूमीवर येरवडा भागातील गेनबा सोपनराव मोझे संस्थेतील 10 विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित केले होते. या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबत सर्व वास्तूंची पाहणी केली. विद्यार्थिनींनी प्रत्येक गोष्टीची उपस्थित अधिका-यांकडून सखोल माहिती जाणून घेतली. ऐतिहासिक वास्तु पाहून झाल्यावर, अजित पवार यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडे पाहत म्हणाले, फोटो काढूयात हे ऐकून सर्वांच्या चेहर्‍यावर एक वेगळच आनंद पाहण्यास मिळाला. दरम्यान अजित पवार यांनी आयुषाशी संवाद साधल्यानंतर तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. आजवर अजित पवार यांना टीव्हीवर पाहिले. मात्र आज त्यांनी आपुलकीने विचारपूस केल्याने खूप आनंदी असल्याची भावना व्यक्त केली.