पुण्यात धुके, सिवानीत धुळ, लुधियानात पाऊस तर सिमल्यात बर्फवृष्टी ! कारगीरला उणे 20 अंश सेल्सिअस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आज हवामानाच्या विविध तर्‍हा पहायला मिळत आहे. पुण्यात आज सकाळी मोठ्या प्रमाणावर धुके आढळून आले तर, हरियानातील सिवानी येथे धुळीचे वादळ आढळून आले. त्याचवेळी लुधियाना येथे पाऊस झाला असून सिमला, वैष्णोदेवी येथे जोरदार बर्फवृष्टी झाली. कारगीरमध्ये आज उणे २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तेथे कमाल तापमान उणे ३ अंश सेल्सिअस आहे.

मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिमल्यामध्ये आज नव्याने जोरदार बर्फवृष्टी झाली असून संपूर्ण सिमला पांढर्‍याशुभ्र बर्फाने झाकून केलेले दिसून येत आहे. सिमल्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून संपूर्ण रस्त्यांवर बर्फ साचला आहे. त्याचवेळी पंजाबमधील लुधियाना येथे आज सकाळी पाऊस झाला. अचानक आलेला पाऊस आणि जोरदार थंड वारे यामुळे लुधियानावासीय कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहे. त्याचवेळी तेथून जवळ असलेल्या हरियानातील सिवानी येथे आज धुळीचे वादळ आढळून आले. तेथे धुळीमुळे सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहचू शकत नव्हता. इतके हे धुळीचे वादळ दाट होते.
पुण्यात आज सकाळी सर्वत्र दाट धुके आढळून आले. सकाळी ९ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी धुक्याचे ढग दिसून येत होते.