जातीअंताच्या क्रांतीसाठी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अनुकरण करावे : विद्रोही सांस्कृतिक आंदोलनाच्या प्रतिमा परदेशी यांचे प्रतिपादन

महात्मा बसवेश्वर संदेश यात्रेचे उदघाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन बसव समिती बंगळुरू द्वारे आयोजित करण्यात आलेल्या विश्वगुरू महात्मा बसवेश्वर संदेश यात्रेचे उदघाटन रविवारी पुणे येथे झाले. या प्रसंगी विद्रोही सांस्कृतिक आंदोलनाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, जर २१ व्या शतकात जातीअंताची क्रांती करायची असेल तर महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांच्या मार्गावर चालावे लागेल.

समाजसुधारक, क्रांतिकारक, समतानायक, लोकशाहीचे जनक महात्मा बसवण्णा यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या हेतूने बसव समिती बंगलुरू चे अध्यक्ष अरविंद अण्णा जत्ती यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते बंगळुरू अशा संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, ज्याचे उदघाटन रविवारी पुण्याच्या बाजीराव मार्गावर असणाऱ्या बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. हि संदेश यात्रा महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यांमधून जाणार आहे. १६ जूनला कोल्हापूर येथे या यात्रेचा समारोप होईल. त्यानंतर यात्रा बंगळुरूच्या दिशेने जाईल.

संदेश यात्रेच्या उदघाटन प्रसंगी प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, १२ व्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी समाजात समता, स्त्री सन्मान, जाती अंतासाठी महान कार्य केले. २१ व्या शतकात जातीअंताची क्रांती करायची असेल तर महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांच्या मार्गावर चालावे लागेल. त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे लागेल. त्यांचे विचार एका विशिष्ठ जाती किंवा धर्मापुरते मर्यदित नसून समाजातील सर्वांसाठी अनुकरणीय आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी माजी आमदार उल्हास पवार यांनी म्हंटले की, विचारांच्या गर्दीत महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांच्या यात्रेचे महत्व आचरणातूनच ठरेल. म्हणून या यात्रेतून महात्मा बसवण्णा यांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा माझ्यात यावी एवढीच अपॆक्षा व्यक्त करतो.

कार्यक्रमात शिवानंद महाराज, लिंगायत संघर्ष समितीचे सुनील रूकारी, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, विश्वेश्वर बँकेचे चेअरमन अनिल गाड़वे, बसव ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष अविनाश भोशिकर, पार्षद हेमंत रासने तसेच हजारो बसव अनुयायी उपस्थित होते. बसवराज कणजे, राजेंद्र आलमखाने, संजय इंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.