स्वयंशिस्ती बरोबरच वाहतूक नियमाचे पालन करा: मंत्री विजय देशमुख

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

दिवसें-दिवस वाढणारी वाहनांची संख्या, वाहन चालकाकडे स्वयंशिस्तीचा अभाव, वाहतूक नियमाचे पालन न करणे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन सार्वजनिक पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर व ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती रंगभवन येथे आयोजित 29 वे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते पाटील, महापौर शोभा बनशेट्टी, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक एस.विरेश प्रभू, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, राज्य सरकारने रस्त्याचा दर्जा व गुणवत्ता सुधारली आहे. तरीपण दररोज होणारे रस्ते अपघात ही चिंतेची बाब आहे. रस्ते अपघाताच्या कारणांचा अभ्यासाअंती मानवी चुकामुळे होणारे अपघाताचे प्रमाण हे सुमारे 84% इतके आहे. त्यामुळे वाहन चालकाने वाहतूक नियमाचे पालन करुन वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. आपला व लोकांचा सुरक्षित प्रवास व्हावा साठी आपणच दक्ष असायला हवे असे त्यांनी सांगितले. रस्ते अपघात कमी करण्यासाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत. या कायद्याचे पालन झाल्यास रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहन चालकाने सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर करावा. वाहन चालकाने मोबाईलवर बोलणे टाळावे. वाहन नेहमी सुस्थितीत राहील यासाठी त्याची वेळेवर देखभाल दुरुस्ती करावी, असेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, ‘वाहनचालकाने नियमांचे पालन करुन वाहन चालविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. वाहन चालवताना एखादी साधी चुकही महाग पडते आणि स्वत:बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात येतो. अपघात कमी व्हावेत यासाठी प्रत्येक विभागाने जनजागृतीपर कार्यक्रम राबवावेत’.

यावेळी पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी रस्ते अपघात वाहतुकीचे नियम, याबाबत सविस्तर माहिती दिली. समिती सदस्य दिलीप कोल्हे व सारंग ताटे यांनी रस्ते अपघाताबाबत माहिती दिली. यावेळी रस्ते सुरक्षा याविषयी काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेची प्रकाशन करण्यात आले.