Pune : हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये जम्बो कोविड केंद्र सुरू करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : हडपसरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्लायडिंग सेंटर येथे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. येथे जम्बो कोविड सुरू झाले, तर पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मदत मिळेल, असे प्रतिपादन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

खासगी रुग्णालयांकडून बेड आणि रुग्णांची संख्या प्रशासनाला दिली जात नाही, त्यामुळे रेमडिसिव्हर मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रशासनामध्ये समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. रेमडिसिव्हरचे उत्पादन कमी आहे, ऑक्सिजन मागणीपेक्षा कमी पुरवठा होत आहे, त्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहे. केंद्राकडून पुरेसा ऑक्सिजन पुरवठा केला, तर परिस्थिती आटोक्यात येईल. यंत्रणेला दोष देण्याऐवजी नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुंढव्यातील कोद्रे हॉस्पिटल, अमानोर लसीकरण केंद्र, काळेपडळ येथील मनपा कै. रोहन काळे दवाखाना, हडपसर गाडीतळ येथील बंटर बर्नाड स्कूल येथे भेट देऊन माहिती घेतली. याप्रसंगी नगरसेवक योगेश ससाणे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी उपमहापौर नीलेश मगर, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा पल्लवी सुरसे, काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे, संजय शिंदे, शीतल शिंदे, अविनाश काळे, माजी नगरसेवक सुनील बनकर, महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. स्नेहल काळे, डॉ. दिनेश भेंडे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका अधिकारी, स्थानिक लोकप्रितनिधी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा खासदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शोभित अनिल मोरे हा कोविड सेंटर येथे काम करत असल्याचे सांगितले. खासदार यावेळी म्हणाले की, कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी कोणी तयार होत नाही, मोरे याने काम करण्यास सुरुवात केली ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, कोरोनाची स्थिती भयंकर आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रसासनाला दोष देण्याऐवजी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. प्रशासनाला सहकार्य करण्याची आज गरज आहे. हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरमध्ये जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतील. दरम्यान, लसीकरण केंद्राची माहिती नागरिकांना वेळेत मिळेल याची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेचे आरोग्य प्रमुख रुबल अग्रवाल यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सूचना केल्या. त्यामुळे लसीकरणासंबंधीच्या अडचणी दूर होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.