‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाणदिनी अनुयायांनी चैत्यभूमी येथे येऊ नये, विविध आंबेडकरी संघटनांचे ‘आवाहन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनी (दि. 6 डिसेंबर 2020) तमाम अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक येथे प्रत्यक्ष येऊ नये, आपापल्या घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन विविध आंबेडकरी संघटनांनी एकमताने केले आहे. तसेच कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयात विविध संघटनांची बैठक आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपआयुक्त प्रणय अशोक, महापालिकेने सहायक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे, रमेश जाधव, नागसेन कांबळे, भिकाजी कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहायक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने विविध नागरी सेवा-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन मागील 8 महिन्यांपासून सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव अत्यंत साधेपणाने आणि एकत्र न येता साजरे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा गांभीर्याने पालन करण्याचा व दुःखाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरून अनुयायांनी अभिवादन करावे, असे दिघावकर यांनी नमूूद केले. अनुयायांना येण्यास निर्बंध असले, तरी महापरिनिर्वाण दिनाची प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय पद्धतीने पूर्ण तयारी केली आहे. चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तीकरिता नियंत्रण कक्ष उभारले जाणार आहेत. अनुयायांना अभिवादन करता यावे म्हणून चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपणदेखील केले जाणार आहे, त्याची लिंक सार्वजनिकरित्या दिली जाईल. महापरिनिर्वाणदिनी थेट प्रक्षेपण करण्यासाठी दूरदर्शनलादेखील विनंती केली आहे.

वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त चव्हाण म्हणाले, कोरोना संसर्ग लक्षात घेता, सर्वांनी विचारपूर्वक व धैर्याने वागून सहकार्य करावे. यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. आपल्यासह सर्वांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सर्वांकडून सहकार्य अपेक्षित आहे. विविध संघटनांनी आपापल्या स्तरावर जनतेला आवाहन करून जनजागृती करावी. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीसदेखील स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी संयुक्त आवाहन करतील, असे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने केलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली आहे.