धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यापुर्वी रेणू शर्मानं आणखी एकाविरूध्द पोलिस ठाण्यात दिली होती तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( dhananjay munde) यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करून रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान रेणू शर्मा हिने अंबोली पोलीस ठाण्यात आणखी एका व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली होती असे निष्पन्न झाले आहे. प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी तीने 2019 मध्ये ही तक्रार दिली होती, असे समोर आले आहे. दरम्यान, ही कागदपत्रे आज प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहेत.

रिझवान इस्ताक शेख या व्यक्तिविरोधात रेणू शर्मा हिने ही तक्रार दिली होती. जून 2018 पासून आजपर्यंत शेख याने माझ्याशी मैत्री करून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच शाररिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून मानसिक त्रास दिला. तसेच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप शर्मा यांनी केला होता. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर रिझवान शेख यानेही रेणू शर्मा हिने आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, रेणू शर्मा ही ब्लॅकमेल करण्याच प्रयत्न करत होती, असा आरोप करत भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच मनसे नेते मनीष धुरी यांनीही शर्माने आपल्याला हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या सा-या प्रकरामुळे धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.