तेल विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – दीवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात सर्वत्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील मार्केट यार्डमधील कृष्णा व्हॅली कार्पोरेशन या तेलाच्या दुकानावर शनिवारी (दि.२०) छापा टाकण्यात आला. भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. यावेळी १ लाख ७ हजार रूपयांचे अकराशे किलो विविध प्रकारचे गोडेतेल जप्त करण्यात आले आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.

दीवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने विविध पदार्थातील भेसळीवर कडक वॉच ठेवण्यात आला आहे. शिवाय विविध ठिकाणी तपासणी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.  मार्केट यार्डमधील खाद्यतेलाचे घाऊक दुकान कृष्णाव्हॅली कार्पोरेशन येथील खाद्यतेलामध्ये भेसळ होत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त चौगुले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शनिवारी या दुकानावर प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी रिफाईन्ड सूर्यफूल, रिफाईन्ड सरकी, रिफाईन्ड सोयाबीन, रिफाईन्ड पामोलीन तेलाचे १५ किलो वजनाचे ६९ डबे जप्त करण्यात आले. त्याचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर व्यापार्‍यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले. दरम्यान तपासणी अहवालातील त्रुटींसाठी संबंधित व्यापार्‍याला कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक आयुक्त चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. दांगट, एस. व्ही. हिरेमठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दीवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात सर्वत्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ विक्री करणार्‍यांनी कोणतीही भेसळ न करता असे पदार्थ विकावेत. पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही सहाय्यक आयुक्त चौगुले यांनी दिला आहे.