अन्न मंत्रायलाचे स्पष्टीकरण, रेशन कार्ड नसलेल्या सर्व लोकांना मिळणार मोफत रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्य सरकारची समस्या दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की, रेशन कार्ड नसलेल्या सर्व लोकांना देशभरात मोफत रेशन सुविधा देण्यात येणार आहे. राज्य अन्न सचिवांना पाठवलेल्या पत्रात अन्न मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या लोकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत किंवा राज्य सरकारकडून रेशन कार्ड तयार केलेले नाहीत, अशा सर्व लोकांना मे आणि जून महिन्यासाठी मोफत रेशन देण्यात येईल. यापुर्वी सांगितले गेले होते की, प्रवासी कामगार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेज अंतर्गत अशा सर्व लोकांनाही दोन महिने मोफत राशन देण्याची घोषणा केली होती ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. अशा लोकांची संख्या देशभरात जवळजवळ 8 कोटी आहे. ज्यांना मे आणि जून महिन्यासाठी प्रति व्यक्तीला 5 किलो धान्य आणि डाळ देण्याची घोषणा केली होती. याच आठवड्यात बुधवारी केंद्रिय कॅबिनेटने या घोषणेवर शिक्का मारला होता. सरकारने पहिलेच पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल, मे आणि जून महिन्यासाठी प्रति व्यक्तीला 5 किलो धान्य आणि डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. जे राष्ट्रीय सुरक्षा योजनेचे लाभार्थी आहे. अशा लोकांची संख्या 81 कोटी आहे.

या प्रकरणावर शुक्रवारी केंद्रिय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी सगळ्या राज्यांच्या अन्नमंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीमध्ये पीएम गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत दिले जाणारे मोफत धान्य वाटप व्यतिरिक्त नेशन वन राशन कार्ड आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या क्रियान्वयनची समीक्षा केली गेली. सगळ्या राज्यांना सांगितले गेले की, पहिले लाभार्थियांना मोफत रेशन देण्याचे काम सुरु केले जावे आणि त्यानंतर त्या लाभार्थियांची सूची अन्न मंत्रालयांना पाठवावी. यासाठी राज्यांना 15 जुलैपर्यंत वेळ दिला गेला आहे.