आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात १४० जणांना विषबाधा

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी केली जात आहे. मात्र अकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. अकोट तालुक्यातील हिंगणी बु. येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. जेवण झाल्यानंतर दुपारी भर उन्हात जेवणातून १४० जणांना विषबाधा झाली. यामध्ये २७ चिमुकल्यांचा समावेश असून या सर्वांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दरवर्षीप्रमाणे हिंगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त जेवणाचा कार्य़क्रम आयोजित केला होता. यावेळी देखील जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हिंगणे हे धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्यांसह गावातील लोकांची मोठी गर्दी होते. आज पहाटेपासून स्वयंपाक बनविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर सकाळी अकरा ते बारा दरम्यान ग्रामस्थ जेवण करून घरी निघून गेले.

सुरवातीला चिमुकल्यांना उलटी, मळमळ सुरू झाली. त्यानंतर एक-एक करीत लहान मोठ्यांसह गावातील जवळपास १४० जणांना विषबाधा होत उलटी सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. यामध्ये २७ चिमुकल्यांचा समावेश असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

You might also like