बारामतीत फळ विक्रेत्याने पोलिसावर उचलला हात, फाडली ‘कॉलर’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. बारामती आणि परिसरात संचारबंदी असताना लॉकडाऊन काळात रस्त्यावर फळे विक्री करत गर्दी जमवलेल्या फळ विक्रेत्यांना शहर पोलिसांनी रोखले. त्यावेळी फळ विक्रेत्यांनी पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने बारामती शहर आणि परिसराच्या हद्दीत कोणतीही दुकाने सुरु राहणार नाहीत. अत्यावश्यक वस्तूंची स्वयंसेवकांमार्फत होम डिलिव्हरी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे पोलीस हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी शहरातील भिगवण चौक ते टी.सी. कॉलेज रस्त्यावरुन जात असताना, ख्रिश्चन कॉलनीजवळ टेम्पोमधून टरबूजाची विक्री केली जात होती.

ही फळं खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पोलीस येताच, खरेदीला आलेल्या लोकांनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी फळविक्रेत्याला नाव विचारले असता त्याने उद्धटपणे उत्तर दिले. त्यावेळी पोलीस कर्मचारी नाळे यांनी गर्दी का जमवली अशी विचारणा केली असता फळविक्रेत्याने पोलिसांसोबत अरेरावी आणि उर्मटपणा सुरु केला. या ठिकाणी फळ विकणार, माझी फळे मी कुठेही विकणार असे म्हणत तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की सुरु केली.

यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी त्यांची सोडवणूक करत फळ विक्री बंद केली. त्यानंतर तिघांना पोलीस ठाण्यात नेत असताना त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा त्यांच्यामध्ये झटापट झाली. याप्रकरणी पोलिसांनी भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर), वैभव बाळासाो मदने (रा. गवार फाटा, ता. बारामती) आणि राजू माणिक बागवान (रा. कचेरी रोड, बारामती) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पोपट नाळे यांनी फिर्याद दिली आहे.