पुण्यात भेसळीच्या संशयावरून 27 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व सुरक्षा विभागाने विशेष मोहित हाती घेतली असून या मोहिमेअंतर्गत मार्केट यार्ड येथे भेसळीच्या संशायवरून 26 लाख 78 हजार 729 रुपयांचे 13 हजार 447 किलो मोहरी तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मार्केट यार्ड येथील चिमणलाल गोविंददास या दुकानात करण्यात आली.

मार्केट यार्ड येथील चिमणलाल गोविंददास या दुकानामध्ये भेसळयुक्त मोहरी तेलाचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती अन्न व सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त बालु ठाकूर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुकानात छापा टाकून अजय ब्रँड मोहरी तेलाच्या 1 लीटरच्या 560 बाटल्या व 15 किलोचे 11 डबे तसेच इंजिन ब्रँडचे 858 डबे आढळून आले. अधिकाऱ्यांनी तीन नमुने प्रयोग शाळेत पाठविले आहेत. प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ही कारवाई अन्न व सुरक्षा प्रशासनाचे सह आयुक्त संपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) बालु ठाकूर, सुरक्षा अधिकारी उल्हास, रमाकांत कुलकर्णी व इम्रान हवालदार यांनी केली आहे.

visit : policenama.com