हिरड्यांमध्ये वेदना असतील तरी जेवण टाळू नका, घ्या ‘ही’ काळजी

पोलिसनामा ऑनलाईन टीम- हिरड्यांच्या पेशी खूपच संवेदनशील असल्याने त्यांना थोडी जरी दुखापत झाल्यास तीव्र, असह्य वेदना होतात. जोरात ब्रश करणे, तोंडात दुखापत, हिरड्यांचे आजार, गरोदरपणात हार्मोन्समध्ये बदल, तोंडात एखादा फोड यामुळे हा त्रास होऊ शकतो. हिरड्यांच्या वेदना असह्य असल्याने अनेकदा काहीही खाता येत नाही. पण अशावेळी उपाशी राहणेही योग्य नाही. हिरड्यांना आणखी त्रास होणार नाही, अशा पदार्थांचे सेवन केल्यास अशक्तपणाही वाढणार नाही.

हिरड्या कोणत्याही कारणामुळे दुखत असल्या तरी काहीही चावून खाल्ल्यास वेदना आणखी वाढतात. त्यामुळे ज्या पदार्थांना जास्त चावण्याची गरज आहे, असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. जी फळे जास्त चावून खाण्याची गरज नसते अशी फळे खावीत. त्यामुळे हिरड्यांच्या वेदना वाढणार नाहीत. केळं, कलिंगड, टरबूज, आंबा ही फळे खावीत. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असल्याने हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते. हिरड्या दुखतात म्हणून भाज्या खाणे टाळू नये. भाज्या मऊ शिजवून घ्याव्यात आणि त्यांचे सेवन करावे, त्यामुळे हिरड्यांना त्रास होणार नाही. उकडून कुस्करलेला बटाटाही खाता येईल. गाजर, मटार, भोपळा, फ्लॉवर या भाज्यादेखील उकडून मॅश करून खाता येतील.

आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. अशा पदार्थाचा दररोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. धान्यांचा समावेश आहारात असायलाच हवा. मात्र, हिरड्यांमध्ये वेदना होत असल्याने काहीजण धान्याचे सेवन टाळतात. त्यामुळे ओटमिल, भात असे धान्य नीट शिजवून खावे. सेरेल्सदेखील काही मिनिटे दुधात भिजवून खाता येईल. हिरड्यांमध्ये वेदना असतील तर कुकीज, पॉपकॉर्न, चिप्स असे पदार्थ खावू नयेत. हे पदार्थ खाल्ल्यास हिरड्यांची समस्या आणखी गंभीर होऊ शकते. त्याऐवजी दही, जिलेटिन, कस्टर्ड, पुडिंग असे अनेक पर्याय आहेत. तसेच आईस्क्रिम आणि मिल्कशेकच्या थंडाव्यामुळेही हिरड्यांना आराम मिळू शकतो.

You might also like