कलाप्रेमींसाठी पुणे आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन

 पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांस्कृतिक शहर म्हणून ख्याती असलेल्या पुणे शहरात रंगसमर्थ आर्ट स्टुडिओच्या वतीने जगभरातील नवख्या आणि उत्साही कलाकारांसाठी पुणे आर्ट फेस्टिव्हलचे आयोजक गणेश केंजळे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन गुरुवार ते रविवार (ता.२६ ते २९) दरम्यान कोथरुड येथील पंडित फार्म्स येथे करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी १० वाजेपासून खुले असणार आहे. प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, क्राफ्ट, छायाचित्रकला अशा विविध कलांची निवड करून हौशी, व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले आणि विद्यार्थी कलाकार त्यांच्या कलेचे सादरीकरण करणार आहे.

फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी (ता.२६) सकाळी दहा वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन आणि कलाकारांचा परिचय होणार असून या दरम्यान प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे एनडिज फिल्म वर्ल्डचे प्रमुख नितीन देसाई यांची मुलाखत घेणार आहे.

फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी (ता.२७) अकरा वाजता अकबर मोमीन यांच्या थ्री डी रांगोळीचे लाईव्ह डेमो प्रदर्शन होणार असून दुपारी तीन वाजता चित्रकार स्पीड आणि मिरर पेंटिंग कलाकार साहिल लाहरी यांचे लाईव्ह डेमो दाखवण्यात येणार आहे.

फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (ता. २८) अकरा वाजता प्रीती यादव यांचा पेंटिंग आर्ट डेमो होणार असून स्वप्ना माळवदे यांच्या ऑईल पेंटिंग कलेचे सादरीकरण होणार आहे. दुपारी तीन वाजता विख्यात कलाकारांचे आर्ट डेमो आणि कार्यशाळा होणार आहे. नाविन्य कायम ठेवण्यासाठी डान्सिंग पेंटर विष्णु मर्देकर यांचे सादरीकरण होणार आहे. फेस्टिवलचा रंगतदार समारोप करण्यासाठी साडेसात वाजता वैशाली सामंत आणि टीमच्या वतीने सांगीतिक मेजवानी सादर होणार आहे. या दरम्यान चर्चासत्र (पॅनल डिस्कशन), कलेचा लाईव्ह डेमो आणि हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे.

फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी (ता. २९) सकाळी दहा वाजता प्रसिद्ध कलाकारांचे आर्ट डेमो आणि कार्यशाळा होणार असून सायंकाळी साडेपाच वाजता राजू कुलकर्णी यांचे इन्स्ट्रुमेंटल सादरीकरण होणार आहे. कलेची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी हा फेस्टीव्हल एक संधी ठरणार आहे. या ठिकाणी रसिकांना ‘आर्ट मेला’च्या अंतर्गत हजाराहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षकांना ५ हजाराहून अधिक कला प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. याशिवाय, हा फेस्टीव्हल कलाकार आणि रसिकांकरिता अधिक मनोरंजक बनवण्यासाठी फॅन फेस्ट, फूड फेस्टिवल, फॅशन शो, एन्टरटेन्मेंट झोन, प्ले एरिया, सुफी नाईट, कॉकटेल पार्टी, वाईन फेस्टीव्हल, रोबोटिक्स आणि लाईव्ह कॉन्सर्टचेही आयोजन करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/