मिळकतकर अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर संकलन विभागातील 61 लिपिकांना कोव्हिड ड्युटीतून केले ‘कार्यमुक्त’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्थायी समितीने मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर प्रशासनाने तातडीने कोव्हीड १९ ड्युटीसाठी तैनात केलेल्या कर आकारणी व कर संकलन विभागातील उपअधिक्षक व टंकलेखक पदावरील ६१ जणांना कोव्हीडच्या कामातून मुक्त केले आहे.
शहरात कोव्हीडची साथ आल्यानंतर महापालिकेच्या सर्वच विभागातील अगदी वरिष्ठ अधिकार्‍यापासून शेवटच्या कर्मचार्‍यांना मागील काही महिन्यांपासून केवळ कोव्हीडच्या ड्युटीवर नियुक्त केले होते. प्रामुख्याने कोव्हिड सेंटरपासून, सर्वेक्षण, रुग्ण नोंदी यासाठी क्लिअरीकल कामांसाठी लिपिक संवर्गातील अनेक कर्मचारी यामध्येच गुंतले होते. यामध्ये कर आकारणी व कर संकलन विभागाकडील ६१ लिपिकांचा समावेश होता. दरम्यान, गुरूवारी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ ऑक्टोबरपासून ५० लाख रुपयांपर्यंत मिळकतकराची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार मिळकतकरावरील दंडाच्या रकमेत ८० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

५० लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले सुमारे साडेचार लाख मिळकतकर धारक आहेत. कोव्हिड साथीच्या काळात महापालिकेचे उत्पन्न घटले असून कोव्हीडवरील उपाययोजनांसाठी महापालिकेने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे व पुढेही खर्च करावे लागणार आहेत. यासाठी अभय योजनेच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचार्‍यांची गरज भासणार आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनानेही तातडीने प्रतिसाद देत कोव्हीड ड्युटीवर असलेल्या ६१ लिपिकांना या ड्युटीतून कार्यमुक्त करण्याचा निर्णय आज घेतला आहे. तसे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.