एअर स्ट्राईकनंतर अटारी – वाघा येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली बैठक होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानकडून सीमेवर रोजच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यात काही नागरिक जवानही शहीद होत आहेत. दरम्यान १४ मार्चाला अटारी – वाघा येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कर्तारपूर काॅरिडाॅरसाठी पहिली बैठक होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान पाकिस्तानने त्यांचे भारतातील उच्चायुक्त सोहिल महमूद यांना पुन्हा भारतात पाठवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर आता कर्तारपूर काॅरिडाॅरसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिली बैठक होणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. या बैठकीत भारत तांत्रिक दृष्टीकोणातूनही चर्चा करण्यात यावी असा प्रस्ताव ठेवणार आहे. या बैठकीबरोबरच भारताचे एक शिष्टमंडळ २८ मार्चला इस्लामाबादला जाणार आहे असेही समजत आहे.

दरम्यान पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रचंड दबाव आल्याचे दिसून आले. पाकिस्तानने दहशतवादाला थारा देऊ नये या मागणीनेही जोर धरला होता. यानंतर पाकिस्तानने जैश – ए – मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या भावासकट ४२ इतर दहशतवाद्यांवर बंदी घालत त्यांना ताब्यात घेतले आहे.