राजकीय भागीदारीसाठी वंचित माळी समाजाची एल्गार परिषद

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – माळी समाजाच्या वतीने वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषद २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या एल्गार परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

याबाबत माहिती देताना महाडोळे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात माळी समाज आज राजकीय मागास ठरलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात २ विधानसभा क्षेत्र व संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा क्षेत्रात माळी समाजाची लोकसंख्या व मताधिक्य हे १०० टक्के निवडून येणार आहे. परंतु एवढे मताधिक्य असताना सातत्याने राजकीय क्षेत्रात माळी समाजाला प्रस्थापित पक्षाने जाणूनबुजून डावलले जात आहे.

प्रस्थापित राज्यकर्त्यांकडून दडपण्याचे कार्य केल्या जात आहे. तेव्हा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक मतदार संघात राजकीय न्याय मिळविण्यासाठी माळी समाज वंचित माळी एल्गार परिषदेच्या माध्यमातून बंड करून उठणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रपरिषदेत माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश अटाळकर, विठ्ठलराव नागतोडे, विजय शहारे, राधेश्याम आयकर, रेखा भुसारी, शंकरराव राऊत, डॉ. राजेश नंदुरकर उपस्थित होते.