राज्यपाल कोश्यारी पहिल्यांदाच बोलले… पहाटेचा शपथविधी, मुख्यमंत्र्यांचे बाहेर न पडणे अन् कंगना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच शपथविधी उरकला होता. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका झाली होती. पहाटे शपथविधी घेतल्यामुळे राजकीय वर्तुळातून त्यांना लक्ष करण्यात आले. दरम्यान पहिल्यांदाच राज्यपालांनी यावर जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली त्याला 5 सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निमित्ताने वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेणारे ‘जन राज्यपाल : भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. त्यावेळी त्यांनी अजित पवार-फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळा, कंगना, मुख्यमंत्र्यांचे घराबाहेर न पडणे यावर भाष्य केले.

पहाटेचा शपथविधी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सकाळी सकाळी शपथविधी उरकून घेतला त्यावरुन आपल्यावर टीका झाली होती. त्याबद्दल आपणास काय वाटते असे विचारले असता, जर कुणी रामप्रहराला शपथ घेतली असेल, तर तुम्ही त्यावर प्रहार कशाला करता असा उलट सवाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे.

राज्यपाल नियुक्त आमदार
विधान परिषदेत राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या निवडीसाठी सरकारने नावे पाठवली नाहीत, सरकारच सुस्त आहे, टीका मात्र माझ्यावर होते, असे सांगत भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला.

राज्यपाल आणि शासनात मतभेद
राज्य सरकारशी आपला कसलाही वाद नाही वा संघर्ष नाही, पण दोन भांडी असेल तर काही वाजणारं. माझे मतभेत नाहीत सगळेच माझे मित्र आहेत.

कंगना प्रकरण
कंगना प्रकरणावरुन आपण राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे का ? या प्रश्नावर माझी नाराजी कुणाला दिसली का, तसे मी कुणाशी काही बोललो का, जे नाराज असतील त्यांनी ते छापले असेल असे सांगत राज्यपालांनी नाराज असलेल्या बातमीचं खंडन केलं.

नेत्यांची टीका
ज्या लोकांनी माझ्यावर टीका केली ते मोठे आहेत. त्यांच्यावर काय बोलणार, आपली जीभ दाताखाली आली तर जीभ तोडत नाहीत. आपलीच माणसे आपल्यावर बोलले तर नाराजी कशाला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांनी राज्यपालांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात कोरोनाचं संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी टीका केली जाते या प्रश्नावर बोलताना राज्यपाल म्हणाले, आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, काय होत आहे हे महत्त्वाचं. मी कुणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही. कोणी विचारलं तर सल्ला देण्याचं काम करतो असे ते म्हणाले.

राज्यपालांचे भविष्यात सक्रिय होण्याचे संकेत
मुख्यमंत्री अथवा मंत्री यांनी एकदा विषय नाकारला असेल तर त्यास न्याय देण्याचं काम राज्यपालांकडे असतं. राज्यपाल सुनावणी करतात. माझ्याकडील प्रलंबित विषय पुढील काळात संपवेल. असे सांगत राज्यपाल यांनी भविष्यात राज्यात अधिक सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.