Pune Containment Zones : पुणे अखेर कंटेन्मेंट झोनमधून ‘मुक्त’ ! 10 महिन्यांनंतर ‘असं’ पहिल्यांदाच घडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झली आहे. आज पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही कंटेनमेंट झोन उरलेला नाही. मार्च महिन्यापर्यंत पहिल्यांदाच असं घडलं आहे.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला होता. दुबईवरून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मुंबईनंतर राज्यात पुणे कोरोना साथीचा केंद्रबिंदू बनलं होतं. पुण्यातील मृत्यूदर मोठा होता जी एक चिंताजनक बाब होती. आरोग्य यंत्रणेचे अथक प्रयत्न, पालिका आणि प्रशासनानं उपलब्ध केलेल्या आरोग्य सुविधा यामुळं कोरोना नियंत्रणासाठी पुकारलेल्या लढ्याला बळ मिळत गेलं.

कोरोना लढ्यात उपचारांसाठी कुचराई होऊ नये यासाठी पुण्यात जंबो सुविधा उभारण्यात आल्या होत्या. सोशल डिस्टेंसिंग आणि इतर नियमांचं पालन केलं जावं यासाठी पोलिसांनीही झोकून देऊन काम केलं. याचंच फळ म्हणून आता पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे. कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झाल्यानं कालच पुण्यातील जंबो कोविड केअर सेंटरही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्यापासून (1 जानेवारी 2020) या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत. यानंतर आता कंटेन्मेंट झोनची बातमी दिलासा देताना दिसत आहे. पुणे महापालिका हद्दीत आता एकही कंटेन्मेंट झोन नाही. पुणे आता कंटेन्मेंट झोनमुक्त शहर बनलं आहे असं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्यात 6 कंटेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ही संख्या 13 होती तर ऑक्टोबरमध्ये पुण्यात 33 कंटेन्मेंट झोन होते. त्याआधी कोरोना साथीनं थैमान घातलं होतं तेव्हा ही संख्या 100 पर्यंत गेली होती.