विम्याच्या पैशांसाठी भाजपा नेत्याने केला नोकराचा खून

रतलाम (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – विम्याचे पैसे मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्याने नोकरचा खून केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार मध्य प्रदेशातील रतलाम येथील कमेड गावात गेल्या आठवड्यात घडला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना खळबळजनक माहिती समोर आली आहे. विम्याचे पैसे आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणि उधारी भागवण्यासाठी या भाजप नेत्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. हिंमत पाटिदार याने आपल्या जुन्या नोकराचा खून करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

23 जानेवारी रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास कमेड गावात भाजपा कार्यकर्ता हिंमत पाटिदार याची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची तसेच मृताची ओळख दडवण्यासाठी चेहरा विद्रूप केल्याची माहिती देणारा फोन पोलिसांना आला. या प्रकरणाची माहिती सर्वप्रथम हिंमत याचे वडील लक्ष्मीनारायण पाटीदार यांनी आपला मुलगा सुरेश याला दिली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. घटनास्थळावरून हिंमत याच्याशी संबंधित असलेल्या अनेक वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या. प्राथमिक तपासात हा मृतदेह हिंमतचाच असावा, असे वाटत होते. मात्र त्याचदरम्यान गावातीलच मदन मालवीय हा बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संबंधित वस्तू शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर काही कपडे आणि चप्पल मिळाले. मदन याच्या वडिलांनी या वस्तूंची ओळख पटवली.

या प्रकारानंतर पोलिसांना हिंमत याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला. अधिक तपास केला असता सापडलेला मृतदेह हा हिंमतचा नव्हे तर मदन याचाच असल्याचे आणि हिंमत याने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याची हत्या केल्याचे उघड झाले.

याबाबत रतलामचे पोलीस अधीक्षक गौरव तिवारी यांनी सांगितले की, ”मृत मदन हा काही वर्षापूर्वी हिंमत पाटिदार याच्या शेतात मजुरी करत होता. दरम्यान, हिंमत याने 17 डिसेंबर रोजी स्वत:चा 20 लाख रुपयांचा विमा उतरवला होता. तसेच त्याच्यावर दहा लाखांची उधारीही होती. या उधारीपासून वाचण्यासाठीच त्याने हे कारस्थान रचले. त्याने आपल्या शेतात काम करणाऱ्या मदन मालवीय याची हत्या केली. त्यानंतर त्याची ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा जाळला आणि स्वत:चा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. दरम्यान, हिंमत पाटिदार सध्या फरार आहे. तसेच त्याच्याबाबत माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली आहे.

Pune : फिर्यादी पोलिसाने साक्ष फिरविल्याप्रकरणी न्यायालयाती कारणे दाखवा नोटीस
महिलेचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर गुन्हा
सागरी मार्गाने दहशतवादी येण्याची शक्यता ; मच्छीमारांना हायअलर्ट