परदेशी कांद्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही देशी कांदा घसरला

लासलगाव – परदेशातून आयात केलेला कांदा शहरांमध्ये वितरणास सुरुवात झाल्याचा परिणाम कांदा दरात दिसून येत आहे.सलग दुसऱ्या दिवशी येथील मुख्य बाजार समितीत कांदा दरात ६०० रुपयांची घसरण झाली असून दोन दिवसात कांदा दर हे एक हजार नऊशे रुपयांनी घसरल्याने बळीराजा हतबल झाला आहे. आज बुधवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमाल ४७११ रुपये, सरासरी ३४०० रुपये तर नवीन लाल कांद्याला कमाल ४२०१ रुपये तर सरासरी ३३०० भाव मिळाला. नव्या लाल कांद्याची आवक पुढील काळात वाढणार आहे. त्याचाही दरावर परिणाम होणार असल्याची धास्ती कांदा उत्पादकांमध्ये आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे दर घसरत असल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आठशे ते हजार रुपयांनी कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांदा आयात केल्यामुळे कांद्याचे दर घसरत असल्याचा आरोप केला जात आहे.

कांदा साठवणूक मर्यादेमुळे मागील आठवडय़ात सलग चार दिवस कांद्याचे घाऊक बाजार बंद राहिले होते. लिलाव सुरू झाल्यापासून दरातील तेजी हळूहळू कमी होत आहे. आता परदेशातून आयात केलेला कांदा महानगरांमध्ये वितरित होऊ लागल्याने स्थानिक कांद्याची मागणी घटत असल्याने कांदा दर हे घसरत आहे.

येथील बाजार समिती ५५९ वाहनातून ६२०० क्विंटल कांद्याची आवक झाली होती त्याला कमाल ४७११ रुपये ,सर्वसाधारण ३४०० रुपये तर किमान ११०० रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाला.