‘या’ कारणासाठी तहसिलदार सचिन डोंगरे यांनी स्विकारली १ कोटीची लाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वारस नोंदणी प्रकरणात निकालपत्र देण्यासाठी मुळशी तहसिलदार सचीन महादेव डोंगरे (वय-४३ रा. लेझी रॉक सोसायटी, रो. हाऊस नं. ३ बावधन, पुणे) यांना १ कोटीची लाच स्विकारताना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (शनिवार) उरवडे गावचे हद्दीत लव्हासा रोडवरील घोटावडे फाटयापासुन ३ किमी अंतरावरील रोडवर सापळा रचून करण्यात आली.  या प्रकरणी ६३ वर्षीय इसमाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

१ कोटीची लाच घेताना मुळशीचा तहसीलदार अँटीकरप्शनच्या जाळ्यात

तक्रारदार यांचे वारस नोंदीचे प्रकरण मंत्रालय येथुन फेरचौकशीसाठी मुळशीचे तहसिलदार सचीन डोंगरे यांच्याकडे आले होते. या प्रकरणामध्ये तक्रारदार यांना निकालपत्र देण्यासाठी व फेरफार करुन ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेण्यासाठी १ कोटी रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने १४ डिसंबर रोजी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. पथकाने तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी पंचासमक्ष डोंगरे याने १ कोटी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज लव्हासा रोडवरील घटावडे फाट्यापासू ३ किलोमीटर अंतरावर लाच घेण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांच्याकडे १५ लाख रुपयांच्या चलनी नोटा आणी ८५ लाख रुपये किंमतीच्या चलनी नोटांच्या आकाराचे कोरे कागद असलेल बॅग दिली. तक्रारदार यांनी पैशांची बॅग सचीन डोंगरे यांना देताच रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, पोलीस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेख घार्गे हे करीत आहेत.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.