महिनाभर बेरोजगार राहिल्यास ७५ टक्के पीएफ काढता येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ)च्या सदस्याला आता महिनाभर बेरोजगार राहिल्यास ७५ टक्के पीएफ काढता येणार आहे. त्यावेळी तुमचे  पीएफ खाते सुरूच राहणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विश्वस्तांबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी ही माहिती दिली.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना १९५२ च्या तरतुदीतील सुधारणेनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास ईपीएफओ सदस्य स्वत:च्या खात्यातील उर्वरित २५ टक्के रक्कम काढून खाते बंद करू शकतो. ईटीएफ म्हणजेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडमध्ये ईपीएफओची गुंतवणूक ४७ हजार ४३१़२४  कोटी रुपयांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. लवकरच हा आकडा एक लाख कोटींच्या घरात जाईल. या गुंतवणुकीवर १६़०७ टक्के परतावा मिळत आहे, असे संतोष गंगवार यांनी सांगितले.

या नव्या योजनेंतर्गत व्यक्ती स्वत:चे पीएफ खाते सुरूच ठेवू शकतो. या खात्याचा उपयोग दुसऱ्या नोकरीमध्येही करता येऊ शकतो. पहिल्यांदा ६० टक्के रक्कम काढता येऊ शकते, असा नियम होता. परंतु सीबीटीने याची मर्यादा वाढवून ७५ टक्के केली आहे. तसेच एक्स्चेंज ट्रेडेट फंडची मर्यादाही १  जुलै २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

You might also like