केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली ‘त्या’ 3 IPS अधिकाऱ्यांची सक्तीची निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली असून, त्यानंतर मुंबई पोलीस दलात बदलीचे वारे पसरले आहे. तसेच याबाबत अनेक नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहे, आता केंद्रीय गृह मंत्रालयाने तीन IPS अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले आहे. तसेच लोकहितासाठी या आयपीएस अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त केले असल्याचे केंद्राने सांगितलं आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सेवानिवृत्त केलेले तिन्ही IPS अधिकारी हे उत्तर प्रदेश राज्यातील केडरमधील आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव (Additional Chief Secretary) अवनीश कुमार अवस्थी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. १९९२ च्या बॅचचे असणारे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांचा यामध्ये समावेश आहे. लोकहितासाठी अमिताभ ठाकूर यांचा सेवेत आता उपयोग नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

दरम्यान, IPS अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी २३ नोव्हेबंर २०१६ मध्ये गृह मंत्रालयाला पत्राद्वारे केडर बदलण्याची मागणी केली. तर त्यांनी उत्तर प्रदेश शासनातील अधिकारी आपल्याशी शत्रुप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला होता. यापूर्वीही त्यांनी केडर बदलण्याची मागणी केली होती. ठाकूर यांनी त्यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांच्यावर धमकी देण्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना २०१५ रोजी निलंबित करण्यात आले होते. ठाकूर यांनी याबाबतची एक ध्वनीफीत सार्वजनिक केली होती. केंद्राने २०१७ रोजी अमिताभ ठाकूर यांची केडर बदलण्याची विनंती मान्य केली नाही.

राज्य शासनाने अमिताभ ठाकूर यांची चौकशी सुरू केली होती. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने ठाकुर यांचे निलंबन ऑक्टोबर २०१५ मध्ये रद्द केले होते. तसेच त्यांना २०१८ मध्ये संयुक्त संचालक नागिरक सुरक्षा पदावर नेमणूक करण्यात आली. दरम्यान, ठाकूर यांच्याबरोबर २००२ च्या बॅचचे पोलीस उपमहानिरीक्षक आणि २००५ च्या बॅचचे पोलिस अधिक्षकांनाही सेवेतून निवृत्त करण्यात आले आहे. ठाकूर यांचा कार्यकाळ २०२८ वर्षामध्ये पूर्ण होणार होता. तर इतर २ अधिकारी एक २०२३ आणि दुसरा २०२४ रोजी सेवानिवृत्त होणार होते.