पोलिसांकडून सीआरपीएफच्या जवानाला मारहाण ; बारामतीत तीव्र पडसाद  

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेची परवानगी घेण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवान अशोक इंगवले यांना पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचे बारामतीमध्ये तीव्र पड्साद उमटले आहेत. बारामती येथील प्रशासकीय कार्यालयासमोर बारामती शहरसह सोनगाव, डोलेर्वाडी, झारगड्वाडी आदी गावातील ग्रामस्थांनी  धरणे आंदोलन केले.

अशोक इंगवले हा जवान सोनगाव येथील राहणारा आहे. आज (रविवार) सकाळी श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेला होता. दुचाकीवरुन ट्रिपल सीट आल्याचा व दारु पिल्याचा आरोप करीत तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच १६ पोलिसांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, आपण दारु पिलो नसल्याचे अशोक इंगवले याने सांगितले. माझी वैद्यकीय तपासणी करा. यामध्ये सत्य बाहेर येईल असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याचे ऐकून न घेता पोलीस ठाण्यात ठेवत बेदम मारहाण केली.

दरम्यान, या घटनेची माहिती युवकांना आणि नागरिकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. याचबरोबरोबर बारामती येथील प्रशासकीय कार्यालयासमोर बारामती शहरसह सोनगाव, डोलेर्वाडी, झारगड्वाडी  आदी गावातील ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. तसेच सबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांना देण्यात आले. यावेळी बारामती तालुका पोलीस ठाण्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.