आंबेगाव तालुक्यात चार दिवसात तीन बिबटे जेरबंद

मंचर : पोलीसनामा ऑनलाईन – आंबेगाव तालुक्यातील कळंबमध्ये गेल्या चार दिवसात दोन बछडे आणि  चार ते पाच वर्षीय मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. चांडोली-कळंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीन बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे येथील नागरिक अत्यंत भीतीच्या वातावरणात वावरत होते. पकडल्यानंतर सदर मादी बिबट्या माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात नेण्यात आल्याची माहिती वनपरिमंडल अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी दिली आहे.

१६ जानेवारीला मारुती उर्फ बाबूंनाथ कहडने यांच्या पाच शेळ्या बिबट्यांनी हल्ला करून ठार केल्या होत्या. वनविभागाने  १७ जानेवारीला त्या ठिकाणी पिंजरा लावून रात्री एकच्या सुमारास बिबट्याला पिजऱ्यात जेरबंद केले. पिंजऱ्यावर इतर दोन बिबट्यांनी रात्रभर ठाण मांडला होता अशी माहिती कहडने यांनी दिली होती. कहडने कुटुंब गेले अनेक दिवस बिबट्याचा दहशतीखाली होते. मादी बिबट्या पकडल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना  दिलासा मिळाला आहे. बिबट्यांचे हल्ले, अपघातांचे सत्र पाहता आंबेगाव तालुक्यात बिबट्या निवारा केंद्र उभारण्याची मागणी होऊ लागली आहे.