सावरगाव साठवण तलावाच्या 7.89 हेक्टर जागेच्या प्रस्तावास वन विभागाची मान्यता

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नामुळे निफाड तालुक्यातील सावरगाव साठवण तलावासाठी वनविभागाची ७.८९ हेक्टर जागा प्रकल्पासाठी देण्याच्या जागेच्या प्रस्तावास वनविभागाकडून मान्यता मिळाली असून सावरगाव साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. लवकरच या तलावाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

निफाड तालुक्यातील साठवण तलाव सावरगाव या योजनेसाठी २२ मार्च २०१९ रोजी वन विभागाकडून टप्पा एक ची मान्यता प्राप्त झालेली होती. या प्रकल्पासाठी शासनाकडून ११ कोटी ७४ लक्ष निधीस मंजुरी मिळालेली आहे. सदर साठवण तलावाकरिता संपादित करावयाच्या ७.८९ हेक्टर वनजमिनीची किंमत, पर्यायी वनीकरण, सर्वेक्षण, झाडे तोडणे इत्यादीसाठी निधीची मागणी शासनाकडे करून ९३ लक्ष ७० हजार रुपये निधी उपवनसंरक्षक पूर्व भाग नाशिक यांना वर्ग करण्यात आलेले होता. तसेच वन प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून सदर ७.८९ हेक्टर वनविभागाच्या जमिनीच्या प्रस्तावास नागपूर येथील कार्यालयास सादर करण्यात आलेला होता. या प्रकल्पाच्या फॉरेस्ट क्लिअरन्सच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी छगन भुजबळ यांनी वनमंत्र्यांना सूचना केल्या होत्या. त्यामुळे या प्रस्तावास दि.२४ फेब्रुवारी २०२० रोजी वनविभागाकडून मान्यता देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय देखील प्रख्यापित करण्यात आलेला आहे.

या साठवण तलाव प्रकल्पाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने निफाड तालुक्यातील सावरगाव, सारोळे, खानगाव, खडकमाळेगाव सह परिसरातील गावांना शेतीसाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. या साठवण तलावाच्या कामाचे कार्यादेश सुध्दा झालेले असल्याने लवकरच या साठवण तलावाच्या कामास सुरवात होणार आहे.