हरीण व काळवीटाच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना अटक, वनविभागाची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – काळविट व हरीण या वन्य प्राण्याची शिकार करून त्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या दोन इसमांच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या असून त्यांना न्यायालयाने सात दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.

वन खात्याच्या प्रसिध्दी पत्रकानुसार, वन खात्यास एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम हरीण व काळवीटाची कातडीची तस्करी करत असून हे दोघे कात्रज येथील जुना बोगदा परिसरात भिलारवाडी गावच्या हद्दीत येणार आहेत. त्यावर मुख्य वन रक्षक विवेक खांडेकर व उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस व दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक भिलारवाडी गावच्या हद्दीत जुना कात्रज बोगदा परिसरात सापळा रचून गणेश लहु पवार व दिपक सुभाष कुलकर्णी या इसमांस ताब्यात घेतले.

त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून हरीण व काळवीटाचे तीन कातडे हस्तगत केले. या गुन्ह्यात वापरलेली सॅन्ट्रो गाडी जप्त केली आहे. या आरोपींस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. यातून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तसेच अन्य सहकारी असल्यास तेही उघडकीस येतील.

या कारवाईत वनरक्षक राहुल रासकर, मनोज पारखे, अनिल राठोड, रवि मगर यांचा सहभाग होता. वनपाल एस. एस. बुचडे व एस. एस. खेडकर यांनी फिर्याद नोंदवली असून मुकेश सणस हे पुढील तपास करीत आहेत.