Pune News : पुण्यात खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुर्मीळ जातीच्या खवल्या मांजरांची तस्करी करणाऱ्या टोळीला पुणे वनविभागाच्या कार्यालयाने पकडले आहे. ही कारवाई जुन्नर आणि संगमनेर परिसरात केली आहे. वनविभागाच्या पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. अंधश्रद्धेपोटी खवल्या मांजरांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

महेंद्र मच्छिंद्र केदार (वय 25), सागर भीमाजी डोके (वय 25, दोघे रा. साकुर, ता.संगमनेर, जि. अहमदनगर), अशोक दादा वारे (वय 29,रा. तहराबाद, ता. राहुरी, जि. अहमदनगर), अनिल धोंडिबा भालेकर (वय 61,रा. विठ्ठलवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

जंगलातील दुर्मीळ प्राणी असलेल्या खवले मांजराची विक्री करण्यावर बंदी घातली आहे. असे असतानाही या प्राण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. खवले मांजराला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याची परदेशात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात खवले मांजराची विक्री करण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती वनविभागाच्या पुणे कार्यालयातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून आरोपांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत भालेकर याचा खवले मांजर विक्री व्यवहारात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भालेकर याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना 18 फेब्रुवारी पर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिला.

ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, सचिन रघतवान, महेश मेरगेवाड यांच्या पथकाने केली.