कोरोनाच्या संकटात मेळघाटच्या बैठकीच्या नावावर वनखात्याची चक्क जंगलात पार्टी !

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनामुळे  सरकारी कार्यालयातही पाच टक्क्यांपेक्षा अधिकची उपस्थिती असू नये, असा आदेश सरकारने काढला. मात्रा, अनेक ठिकाणी त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे .मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात अधिकारी व कर्मचार्‍यांसह बैठकीच्या नावावर सुमारे 40 जणांची पार्टी रंगल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या क्षेत्राच्या आमदारांनीच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे.

चिखलदरा तालुक्यातील रायपूर, सेमाडोह मार्गावर रायपूरपासून सात ते दहा किलोमीटर अंतरावर वनखात्याची कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटी आहे. एक मे रोजी महाराष्ट्रदिनी  सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. एस. शिवबाला यांच्यासह इतर विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी पार्टी करत असल्याची तक्रार मेळघाटचे आमदार राजकु मार पटेल यांनी अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे केली होती. त्यामध्ये एक अधिकारी प्रतिनियुक्तीवर इतर विभागात जात असल्याने ही पार्टी केल्याचा आरोपही केला. या पत्राला काही तास होत नाही तोवर त्यांनी पत्र मागे घेतले.

माझी दिशाभूल करण्यात आली. काही राजकीय विरोधकांकडून ही खोटी माहिती पुरवून माझ्यात व वनाधिकार्‍यात वैमनस्य निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, या आशयाचे पुन्हा एक पत्र त्यांनी पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांना लिहिले. तर दुसरीकडे सिपना वन्यजीव विभागानेही झालेल्या प्रकाराचे खंडन केले. अशी कुठलीच पार्टी आम्ही केली नाही. तर वणव्याचा ऋतू असल्याने सेमाडोह ते रायपूर वनक्षेत्रात सामूहिक पायदळ गस्त करण्यात आली. दरम्यान, दुपारच्यावेळी मध्यंतरात सर्वानी जेवण केले, असा खुलासा त्यांनी केला. हा खुलासा ग्राह्य धरला तरी वन्यजीव विभागाच्या गस्तीत प्रादेशिक विभागाच्या उपवनसंरक्षक कसे उपस्थित होते, हा प्रश्न कायम आहे.