वन विभागाचा ‘अजब’ कारभार, अर्धा पेपर झाला असताना परिक्षा रद्द

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन-  वनविभागाने विविध पदांसाठी भरतीप्रकिया सुरू केली. यात रविवारी वनरक्षक पदासाठी ऑनलाईन पेपर घेण्यात आला. मात्र अचानक अर्ध्यातूनच पेपर रद्द करण्यात आल्याने उमेदवार संतप्त झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी धडक दिली. मात्र सुटीमुळे जिल्हाधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. ते सोमवारी भेटणार आहेत.

वनविभागाने वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी रविवारी महापोर्टलमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. येथील डॉ.भाऊसाहेब नंदूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात हा ऑनलाईन पेपर घेण्यात आला. सकाळी ११ वाजताचा पेपर तब्बल दोन तासांनी म्हणजे १ वाजता सुरू झाला. पहिल्या पाळीतील उमेदवारांचा पेपर सुरळीत पार पडला. यानंतर दुसऱ्या पाळीतील उमेदवारांना दुपारी २:३० वाजता पेपर देण्यात आला. मात्र वनविभागाने अचानक हा पेपर अर्ध्यातच रद्द केला.

ही परीक्षा राज्य शासनाच्या माहापोर्टलवरून राबविण्यात आली. परीक्षेची संपूर्ण जबाबदारी महापोर्टलची आहे. परीक्षा घेताना महापोर्टलला यात तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे पेपर अर्ध्यातून रद्द झाला. मात्र २५० विद्यार्थ्यांचा पेपर पुन्हा घेतला जाईल, असे सांगण्यात आले.