Pooja Chavan Suicide Case : वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. त्यातच आता त्यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून दिले गेल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. तसेच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही हा विषय लावून धरला होता. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच संजय राठोड यांचा राजीनामा मागितला असल्याचे सांगितले जात आहे.

संजय राऊत यांचेही संकेत
शिवसेनेच्या नेत्याचे नाव या आत्महत्येप्रकरणात आल्याने पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे हे याप्रकरणी डोळे मिटून बसलेले नाहीत. ते लक्षपूर्वकपणे यावर निर्णय घेतील. असे म्हणत राजीनाम्याचे संकेत दिले होते.

…तर अधिवेशन होऊ देणार नाही
सोमवारपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला होता. तसेच अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणावर सविस्तर माहिती द्यावी लागेल, असेही विरोधकांकडून सांगण्यात आले होते.