संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा ? वनखाते कोणाकडे ?

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे पक्षासोबतच महाविकास आघाडी सरकारची बदनामी होत असल्याने राठोड उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राठोडांच्या राजीनाम्यासाठी सेनेवर दबाव वाढत आहे. तसेच पक्षाची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील राठोड यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असून त्यात विरोधक राठोडांचा मुद्दा चांगलाच लावून धरणार असल्याचे सांगत आहेत. राठोडांचा राजीनामा घेतला नाहीतर विरोधक अधिवेशनामध्ये आक्रमक होतील, त्यामुळे उद्या राठोड मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर विदर्भातील शिवसेनेच्या एका आमदाराला वनमंत्रिपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.