Lockdown मध्ये 1.75 लाख रुपयाची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह महिला अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – गडचिरोली वडसा वन विभागाच्या फिरत्या पथकातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला 1 लाख 75 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टि करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. दिवाकर रामभाऊ कोरेवार (वय-48) आणि बेडगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा पूनमसिंग उईके या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

कोरची येथील 55 वर्षीय तक्रारदार यांनी याप्रकरणी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार यांना सर्व्हे क्रमांक 1 ते 11 मधील मालाच्या चौकशीत शिथीलता देण्यासाठी वडसा वन विभागातील फिरते पथकातील (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) वनपरिक्षेत्र अधिकारी दिवाकर कोरेवार व कोरची तालुक्यातील बेडगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रेरणा उईके यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तडजोडीत 1 लाख 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाचेची ठरलेली रक्कम प्रेरणा उईके यांच्यामार्फत स्विकारण्यात आली. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना वन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आल्याने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, पोलीस नाईक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई गणेश वासेकर, महेश कुकुडकर, घनश्याम वडेट्टीवार यांच्या पथकाने केली.