‘फरारी’ असं पोलीस दप्तरी नोंद असलेला माजी आ. धवड आमदार राऊत यांना शुभेच्छा देतानाचा फोटो ‘व्हायरल’ !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नवोदय को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या लेखी फरार असलेला माजी आमदार व बँकेचा अध्यक्ष अशोक धवड हे नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांना शुभेच्छा देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. सुप्रीम कोर्टाने अशोक धवड यांना पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला असतानाही तो राजरोजपणे उघड फिरत आहे.

२४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन त्यात नागपूर उत्तरमधून काँग्रेसचे नितीन राऊत हे निवडून आले. त्यानंतर अशोक धवड याने त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याचा फोटो अशोक धवड यांनी स्वत: त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकला. त्यात त्यांच्याबरोबर सतीशबाबु चर्तुवेदी, दीनानाथ पडोले, नरेंद्र जिचकार, नितीन कुमभल्कर उपस्थित होते.

नवोदय को ऑप. बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांचा काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांना त्यांना अटक करण्यात कोणताही अडथळा नाही. असे असतानाही नागपूर पोलिसांच्या लेखी अशोक धवड हे फरारी आहेत.

बँकेचे ठेवीदार श्रीकांत सुपे यांच्या फिर्यादीवरुन धंतोली पोलिसांनी अशोक धवड यांच्यासह इतरांच्या विरोधात फसवणुकीच्या विविध कलमासह एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बँकेतून २०१४ मध्ये सुमारे ४ कोटी ३ लाख रुपये बेकायदा काढण्यात आले. तसेच बनावट कागदपत्रांद्वारे हा पैसे परत जमा केल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारे ३८ कोटी ७५ लाख रुपयांचा गैरप्रकार बँकेत झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर धवड यांनी आधी सत्र न्यायालयात, नंतर हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हायकोर्टाने ३१ जुलै रोजी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला व त्यांना पोलीस ठाण्यात आत्मसमपर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल करण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी दिली आहे.

Visit : policenama.com